करमाळा (सोलापूर) : विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थिनी अनुराधा राऊतने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या योगा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठअंतर्गत आंतर महाविद्यालयीन योगा स्पर्धा मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालय येथे झाल्या. या स्पर्धेमध्ये विद्यापीठअंतर्गत विविध महाविद्यालयातील ४२ खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेमध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाची विद्यार्थिनी राऊत हिने प्रथम क्रमांक मिळवला. याशिवाय स्पर्धेमधील उत्कृष्ट खेळाडू म्हणून बहुमान पटकावला. अनुराधा ही यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या बीएस्सी प्रथम वर्षामध्ये शिकत आहे. या स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल संस्थेचे सचिव विलासराव घुमरे, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. पाटील, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक, महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. रामकुमार काळे, कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.