करमाळा (सोलापूर) : श्री देवीचामाळ येथील मूकबधिर मतिमंद शाळेत तिसरीत शिकत असलेल्या ओम धनवे या विद्यार्थ्याला लहानपणापासून ऐकू येत नव्हते. त्याच्या कानाच्या ऑपरेशनसाठी सुमारे १० लाख खर्च लागणार होता. हे उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षचे मंगेश चिवटे यांना समजले. त्यानंतर त्यांनी उपचारासाठी संबंधित धनवे यांना रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर यावर ऑपरेशन करण्यात आले. ओमचे मामा विनोद शिंदे (रा. केडगाव चौफुला, जि. पुणे) यांनी यासाठी परिश्रम घेतले. त्याच्यावर लोणी काळभोर येथे उपचार करण्यात आले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिफारशीनुसार शासकीय मदत योजनेतून या मुलाच्या कानावरील यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. आता या मुलाला पूर्णपणे ऐकू येणार आहे. ऑपरेशन करून करमाळ्यात आल्यानंतर शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी ओम बुवासाहेब धनवे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.