करमाळा (अशोक मुरूमकर) : सीना नदीला आलेल्या पुरावेळी बिटरगाव (श्री) येथील नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहनांचे भाडे व जनावरांना मोफत चारा दिल्याबद्दल नंदकुमार दळवी यांचा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन आज (शुक्रवार) सन्मान करण्यात आला. तहसील कार्यालय येथे वाहनमालक यांना हे भाडे देण्यात आले. यावेळी दळवी यांचे तहसीलदार ठोकडे यांनी विशेष कौतुक केले.
करमाळा तालुक्यात सीना नदीला तीनवेळा आलेल्या महापुरामुळे खडकी, आळजापूर, तरटगाव, बिटरगाव श्री, बाळेवाडी, निलज, पोथरे, बोरगाव येथे अनेक घरांमध्ये पाणी शिरले होते. जीवितहानी होऊ नये म्हणून तहसीलदार ठोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन प्रयत्न करत होते. पोलिस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस गावागावात भेटी देऊन नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सूचित करत होते. अनेक ठिकाणी संतोष वारे हे देखील उपस्थित होते.
पहिल्या व तिसऱ्या महापुरावेळी बिटरगाव श्री येथील नागरिकांना पोथरे येथील आनंदी मंगल कार्यालय येथे स्थलांतरित करण्यात आले होते. त्यासाठी संतोष माने यांची गाडी, बाळासाहेब शिंदे यांचे पिकअप, भाऊसाहेब बाबर यांचे पिकअप व दिलीप मुरूमकर यांचा ट्रॅक्टर वापरण्यात आला होता. तर तहसील कार्यालय येथून पुरगस्त नागरिकांचे कीट व जनावरांचा चारा नेहण्यासाठी बापूराव मुरूमकर यांची गाडी वापरण्यात आली होती.

पूरग्रस्तांसाठी किराणा कीट, जेवण, चादर, साडी, भांडी अशा गृहउपयोगी वस्तूची मदत मिळाली. मात्र पूरस्थितीत नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी वापरण्यात आलेले वाहनचालक दुर्लक्षित राहिले होते. हे लक्षात घेऊन दळवी यांनी आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांचा सन्मान तहसीलदार ठोकडे यांच्या हस्ते झाला. यावेळी आदर्श शिक्षक संतोष पोतदार, प्रभारी केंद्रप्रमुख निशांत खारगे, प्रवीण घोडके, बबनदादा मुरूमकर, रामहरी दळवी, जहांगीर शेख, गोकुळ बाबर, नितीन मुरूमकर, दिलीप मुरूमकर, अशोक मुरूमकर आदी उपस्थित होते.