करमाळा (अशोक मुरूमकर) : सरकारकडून समग्र शिक्षा अभियानातंर्गत दिव्यांग, बहुविकलांग, मतिमंद व सेरेब्रल पाल्सी (CP) लक्षणे असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दरवर्षी आर्थिक मदत दिली जाते. यावर्षी दिवाळीच्या तोंडावर संबंधित विद्यार्थ्यांच्या व पालकाच्या जॉईंट बँक खात्यात ही रक्कम शालेय शिक्षण विभागाकडून जमा करण्यात आली असल्याने या विद्यार्थ्यांची दिवाळी गोड होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना सरकारकडून मदतनीस भत्ता दिला जातो. शैक्षणिक कालावधीत पाच महिन्याचे तीन हजार रुपयांप्रमाणे हा भत्ता असतो. यामध्ये पहिली ते आठवी व नववी ते १२ पर्यतच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याशिवाय विद्यार्थिनींना प्रोत्साहन भत्ता म्हणून १००० रुपये दिले जातात.
करमाळा तालुक्यात गटशिक्षण अधिकारी नितीन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली समानव्यक गणेश मुंडे यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांच्या खात्यात हे पैसे जमा केले आहेत. मुंडे म्हणाले, ‘करमाळा तालुक्यात ३१४ दिव्यांग विद्यार्थी आहेत. त्यापैकी १३५ विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे पाठवले आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे पैसे ट्रान्सफर केले आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र सादर करणे बाकी आहे. त्यांचे पैसे ट्रान्सफर झालेले नाहीत. याशिवाय तीन विद्यालये जिल्हा परिषदेच्या शाळे अंतर्गत येत नाहीत त्यांचेही पैसे पाठवण्यात आलेले नाहीत.’
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘या योजनेसाठी संबंधित विद्यार्थ्याकडे ४० टक्केपेक्षा जास्त दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. अथवा संबंधित विद्यार्थी बहुविकलांग, मतिमंद, हस्तिभंग व सेरेब्रल पाल्सी (CP) असणे आवश्यक आहे. अशा पात्र विद्यार्थ्यांना सरकारकडून समग्र शिक्षा अभियानातंर्गत पैसे दिले जातात. यावर्षी दोन टप्प्यात हे पैसे दिले जात आहेत. त्यातील एक टप्पा देण्यात आला आहे.