करमाळा (अशोक मुरूमकर) : शाळा, महाविद्यालय, एसटी स्टॅंड याशिवाय गर्दीच्या ठिकाणी महिला व मुलींची रोडरोमियांकडून छेड काढली जाऊ नये म्हणून निर्भया पथक ऍक्शन मोडवर आले आहे. याबाबत व्हिडीओच्या माध्यमातून जनजागृती केली जात असून पिडीतांनी अन्याय व अत्याचार झाल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन निर्भया पथकाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक गिरीजा मस्के यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले आहे.
निर्भया पथकाच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक मस्के म्हणाल्या, ‘पोलिस अधीक्षक अतुलचंद्र कुलकर्णी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर व उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथक काम करत आहेत. करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या नियंत्रणाखाली करमाळा, कुर्डुवाडी व टेंभुर्णी या पोलिस ठाण्यात हे पथक कार्यरत आहे. शाळा व महाविद्यालयातील मुली सुरक्षितपणे शिक्षण घेतील त्यांना कोणताही त्रास होणार नाही. याची खबरदारी घेतली जात आहे. रोडरोमियो अनेकदा मुलींची छेड काढण्याचा प्रकार करतात. त्यामुळे पालक मुलींचे शिक्षण बंद करतात. मात्र या पथकाच्या माध्यमातून आम्ही पालक व मुलींना विश्वास देत आहोत.’
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, ‘पीडित मुलींना तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात येण्याची आवश्यकता नाही. किंवा त्यांची ओळख सांगण्याची गरज नाही. प्रत्येक शाळा व महाविद्यालयात यासाठी तक्रारपेठी केलेली आहे. त्यात त्या तक्रार करू शकतात. याशिवाय थेट पोलिसांशी संपर्कही साधू शकतात. यामध्ये तक्रार केलेल्याची ओळख गोपनीय ठेवली जाते. त्यांना पूर्ण संरक्षण पोलिसांकडून दिले जाते. त्यामुळे पीडितांना अन्याय व अत्याचार सहन न करता पुढे आले पाहिजे. याची जनजागृती करण्यासाठी पोलिसांकडून व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत. पथनाट्याच्या माध्यमातूनही जनजागृती केली जात आहे.’
कारवाईबाबत बोलताना मस्के म्हणाल्या, ‘महाविद्यालय व शाळेच्या १०० मीटर परिसरात पानटपरी, मद्यविक्री दुकाने अशाठिकाणी विनाकारण थांबणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. याशिवाय बालविवाह रोखले गेले आहेत. काही घटनात पॉस्कोचे गुन्हे दाखल झाले आहेत. यातील संशयित आरोपी व तक्रारदार याची ओळख गोपनीय ठेवली जात आहे. पोलिस मदतीसाठी तत्पर आहेत’ असे सांगतानाच ‘पिडीतांनीही अन्याय अत्याचार सहन न करता तक्रारीसाठी पुढे यावे’, असे आवाहन त्यांनी केले आहे.