करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील करंजे येथे पाण्याने डबडबलेल्या विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला स्थानिक नागरिकांनी मोठ्या धाडसाने जीवदान दिले आहे. याबद्दल आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक रविकिरण फुके यांनी या वन्यप्राणी प्रेमींच्या धाडसाचे कौतुक केले आहे. करंजे येथील हारुणभाई मुलाणी यांची विहिर पाण्याने भरली आहे. यामध्ये एक कोल्हा पडल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले. त्यानंतर विक्रम ठोसर, बारीकराव ठोसर, भिवा आरणे, बाळू डोलारे, खंडू ठोसर, नागराज ठोसर या तरुणांनी या कोल्ह्याला विहिरीच्या बाहेर काढून निसर्गाच्या सानिध्यात सोडले.

मुलाणी यांच्या विहिरीत सध्या प्रचंड पाणी आहे. त्यामध्ये दोन दिवसापूर्वी रात्री कोल्हा पडला होता. मुलाणी हे शेतात गेले तेव्हा विहिरीत पाण्यात काकडून थकलेल्या अवस्थेत बसलेला एक कोल्हा दिसला. प्रयत्न करूनही त्याला बाहेर निघत येत नव्हते. त्या विहिरीच्या चार प्लेट बांधकामाच्या आहेत. त्याखाली पाणी होते. तेथे जाणेही कठीण होते. मात्र स्थानिक नागरिक कोल्ह्याला जीवदान देण्यासाठी दाव्याच्या साह्याने खाली उतरले. त्यात खाली उतरलेला एकजण पाण्यातही पडला. मात्र कोल्ह्याला वाचवण्यासाठी त्यांनी कशाचाही विचार केला नाही. कोल्हा सुखरूपपणे बाहेर यावा म्हणून त्यांनी पिशवी व दाव्याचा वापर केला. विहिरीच्या बाहेर निघताच कोल्ह्याने निसर्गाच्या सानिध्यात धूम ठोकली.