करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘साडे येथील १४ वर्षांच्या मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी संशयित आरोपींवर खूनाचा गुन्हा दाखल करा’ या मागणीसाठी काल (शुक्रवारी) सायंकाळी सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपच्चार रुग्णालय येथून मृतदेह आणून करमाळा पोलिस ठाण्यासमोर ठेवत नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. दरम्यान ‘एकाच सेकंदात तुमचा गुन्हा दाखल करून घेतला जाईल. मात्र संबंधित घटनेत खुनाचा गुन्हा होऊ शकत नाही. कायदेशीररित्या योग्य तो गुन्हा दाखल केला जाईल. संबंधित मृतदेहावर अंत्यसंस्कार करा’, असे पोलिस निरीक्षक रणजित माने यांनी स्पष्ट केले. त्यानंतर या घटनेत दमदाटी करून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी व जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी सात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
साडे येथील एका १४ वर्षाच्या मुलाचा हृदयाचा आजार असल्याने मृत्यू झाला. त्याला हृदयाचा आजार असल्याची माहिती असताना सुद्धा गुन्हा दाखल झालेल्या संशयितांनी ७ तारखेला घरी येऊन दमदाटी केली. ‘दिपकमुळे आमचे खूप नुकसान झाले आहे. ते भरून दे नाही तर रात्रीत तुझे घर पेटून देईन’ अशी धमकी त्यांनी दिली. तेव्हा फिर्यादीच्या घरात कोणीही पुरुष नव्हता. त्यामुळे मृत्यू झालेल्या मुलाला नातेवाईनी दुसऱ्या दिवशी सोलापूर येथील सिव्हिल रुग्णलयात त्याला दाखल केले. दरम्यान त्याचा १७ तारखेला मृत्यू झाला. यात दमदाटी केलेले मृत्यूस कारणीभूत असल्याचा आरोप नातेवाईकांचा आहे.
सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपच्चार रुग्णालय येथून काल सांयकाळी नातेवाईकांनी मृतदेह करमाळा पोलिस ठाण्यासमोर आणला. संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. संबंधित घटनेत खुनाचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, अशी समजूत पोलिस निरीक्षक माने यांनी नातेवाईकांची घातली.
पोलिस निरीक्षक माने म्हणाले, ‘रुग्णालयात रुग्ण दाखल होताना तेथे एमएलसी नोंद झाल्यानंतर पोलिस जबाब घेतात. मात्र या घटनेत आमच्याकडे एमएलसी आली नाही. मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन अहवाल महत्वाचा ठरतो. त्यानुसार कायदेशीर गुन्हा दाखल होईल. करमाळा पोलिसांकडून कधीही कोणावर अन्याय होणार नाही.’
पोलिस निरीक्षक माने व करण आल्हाट, दीपक लोंढे, भाजपचे शशिकांत पवार यासह मृतांचे नातेवाईक यांच्यात बराचवेळ चर्चा सुरु होती. दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा या देखील घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर रुग्णवाहिकेत मृतदेह ठेवण्यात आला. सर्व कायदेशीर प्रकिया करून मृतदेह साडे येथे नातेवाईकांनी नेला.