करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘राज्याचे मुख्यमंत्री बिहारला निवडणूक प्रचारासाठी जात आहेत. पण येथे मदत मिळत नसल्याने शेतकरी, दलित मरतोय, आदिवासी मारला जातोय. यावर ते बोलत नाहीत पण कबुतरखान्यावर ते बोलत आहेत परंतु अन्यायावर का बोलत नाहीत? राज्याच्या गृहमंत्र्यांना दलितांची कदर नाही. न्यायाचा बहिष्कार आमच्यावर टाकला आहे. हा बहिष्कार आम्हाला भयभीत करणारा आहे’, असे म्हणत ऑल इंडिया पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता घणाघात केला आहे. ‘न्याय मिळाला नाही तर राज्यात आरक्षणासाठी सरकारचेच लोक सहभागी असलेले मोर्चे निघत आहेत. तसेच मोर्चे आमच्या ऍट्रॉसिटी बचावासाठी काढले जातील’, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
करमाळ्यात आज (शनिवार) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) पश्चिम महाराष्ट्र संघटक नागेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली ‘ऍट्रॉसिटी बचाव आंदोलन’ झाले. अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार दाखल गुन्हात कडक कारवाई व्हावी या मागणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालय परिसरात पोलिस ठाण्यासमोर या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. दीपक ओहोळ यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर नागेश कांबळे व केदार यांची भाषणे झाली.
केदार म्हणाले, ‘कांबळे यांच्या नेतृत्वात करमाळ्यात ऍट्रॉसिटी वाचवण्याचा सुरु झालेला लढा राज्यभर पेटणार आहे. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन होऊ नये. क्रॉस केस होऊ नये याची दक्षता घेतली पाहिजे. मात्र तसे होताना दिसत नाही.’ पुढे बोलताना ते म्हणाले, ‘राज्यात आरक्षणाचे जसे मोर्चे निघत आहेत तसे मोर्चे ऍट्रॉसिटी बचावासाठी काढले जातील. आमचा अंत पाहू नका संविधान जिवंत आमच्यामुळे आहे. संविधान रक्षक आम्ही आहोत. राजकारण्यांना घाबरणारे आम्ही नाहीत. दबावात काम करू नका’, असे आवाहन करतानाच ‘ऍट्रॉसिटीमधील कारवाई वाढावा. गुन्हेगारांना अटक करा’, अशी मागणी त्यांनी केली. ऍट्रॉसिटीचे आंदोलन हा मुद्दा आता करमाळ्याचा राहिलेला नसून पूर्ण राज्याचा झाला आहे’, असे ते म्हणाले.
पुढे बोलताना केदार म्हणाले, ‘उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रकरणात आमदार अमोल मिटकरी यांनी करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा यांची माहिती मागवली. मात्र तेव्हा आम्ही त्यांच्या बाजूने उभा राहिलो. आता आमच्यावर अन्याय होणार असेल तर संपूर्ण राज्यात हे आंदोलन पेटेल’. असा इशाराही केदार यांनी दिला. कांबळे यांनी ऍट्रॉसिटी आंदोलन करण्याची वेळ का आली याची माहिती सांगितली. संबंधित गुन्ह्यातील संशयित आरोपीवर त्वरित कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली आहे.