कामोणेत नारळ शेतीबद्दल शेतकऱ्यांसाठी तांत्रिक माहितीचे मार्गदर्शन शिबिर

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘नारळाचे महत्व कायम वाढत जाणार आहे. योग्यरीत्या नारळाची शेती केली तर उत्पादनही चांगले मिळते. सरकार यासाठी अनुदानही देत आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा’, असे आवाहन नारळ विकास मंडळाचे डेव्हलपमेंट ऑफिसर रवींद्र कुमार यांनी केले.

कामोणे येथे आज (गुरुवार) नारळ विकास मंडळ, ठाणे व बीएनके फूड्स अँड हर्बलच्या वतीने शेतकऱ्यांसाठी नारळ शेतीबद्दल तांत्रिक माहितीचे मार्गदर्शन शिबिर झाले. यामध्ये नारळ विकास बोर्डाचे रवींद्र कुमार, तांत्रिक सहाय्यक विपिन पी. यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी करमाळा तालुका कृषी अधिकारी राजेंद्र नेटके, मंडळ कृषी अधिकारी अमर अडसूळ, सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल आदी उपस्थित होते.

करमाळा तालुक्यात नारळ लागवडीचे क्षेत्र वाढवण्यासाठी यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. नारळाची लागवड करताना दोन झाडांमधील योग्य अंतर, रोग पडू नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे, नारळ काढणी, नारळाला पाणी देण्याबाबत काय काळजी घेतली पाहिजे याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित शेतकऱ्यांनीही यावेळी त्यांच्या शंका मांडल्या. कृषी सहाय्यक दादा नवले यांनी लिंबू शेतीबाबत मार्गदर्शन केले. सुजित बागल यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रगतशील शेतकरी बाळासाहेब काळे यांनी आवळा शेती व नारळ शेतीबाबत त्यांचे अनुभव शेतकऱ्यांना सांगितले. फळबाग योग्यरीत्या केली तर त्याचा कसा फायदा होतो याचे त्यांनी उदाहरणासह सांगितले. काळे हे राज्य सरकारच्या कृषी विभाग उद्यान पंडित पुरस्कारचे मानकरी आहे आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *