करमाळा (सोलापूर) : महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याच्या आरोपाखाली अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी प्राचार्य डॉ. लक्ष्मण पाटील यांना अखेर करमाळा पोलिसांनी अटक केली आहे. करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा यांच्याकडे या प्रकरणाचा तपास सुरु आहे. संबंधित गुन्ह्यातील आरोपाला अटक करण्यासाठी आरपीआयचे नागेश कांबळे यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले होते. तेव्हा दीपक केदार यांची उपस्थिती होती.
एका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पाटीलने महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचा गुन्हा सप्टेबरमध्ये दाखल झाला होता. चौकशीच्या नावाखाली त्यांना नोटिस देऊन सोडण्यात आले होते. त्यामुळे रिपाईचे कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंबेडकरी समाजाने अट्रॉसिटी बचाव आंदोलन केले होते. दरम्यान आरोपीकडून अटकपूर्व जामीनसाठी प्रयत्न सुरु होते.
कांबळे म्हणाले, ‘एट्रोसिटी हा विशेष कायदा असून त्यासाठी विशेष न्यायालयाची तरतूद असून तो नवीन सीआरपीसी व बीएनएस कायद्यांना प्रिवेल करतो. पोलिस प्रशासनाच्या वतीने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम ३५ (३) अन्वये फक्त नोटिस देऊन अटक न करता सोडून देणे हे पीडितासाठी न्याय नाकारल्यासारखे असून याविरोधात संपूर्ण अनुसूचित जाती जमातींमध्ये संतापाची लाट आहे.’

 
		 
		 
		