करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा दिवस जसा जवळ येत आहे तशा उमेदवारांच्या नावांच्या देखील चर्चा वाढू लागल्या आहेत. जगताप, बागल, सावंत व देवी या गटांच्या व्याहूरचना काय असेल याबाबत अजूनही संभ्रम असून राजकीय वर्तुळात मात्र तर्कवितर्क लावले जात आहे. त्यात जगताप गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराचा आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असल्याने उमेदवारी निश्चित झाली असल्याचेच बोलले जात आहे. मात्र माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्याकडून याबाबत अजूनही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत जगताप गट यावेळी सत्ता कायम ठेवतील का? हे पहावे लागणार आहे. नगराध्यक्षपद महिलेसाठी राखीव आहे. जगताप, बागल, सावंत व देवी या प्रमुख गटांमध्ये स्थानिक पातळीवर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यात आमदार नारायण पाटील व माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्याही भूमिका महत्वाच्या राहतील.
भाजपमधील देवी, बागल व चिवटे हे एकत्र येणार का? हे देखील पहावे लागणार आहे. त्यावरून नगराध्यक्षपदाचा उमेदवार त्यांचा ठरला जाऊ शकतो. महायुती म्हणून निवडणुकीत उतरायचे तर जगताप हे सध्या शिवसेनेकडे (शिंदे गट) आहेत. जिल्हा प्रमुख महेश चिवटे व बागल यांच्यात संघर्ष आहे. जगताप व बागल हे पारंपरिक विरोधी गट आहेत. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची भूमिका काय असणार? माजी आमदार शिंदे यांची राष्ट्रवादीशी जवळीक आहे. त्यामुळे त्यांच्यात उमेदवार कोण ठरेल हे पहावे लागणार आहे. सुनीता देवी, डॉ. वैशाली घोलप व घुमरे यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र त्यांचा उमेदवार कोण निश्चित होईल हे पहावे लागणार आहे.
जगताप गटाकडून संगीता श्रेणिकशेट खाटेर व नंदिनीदेवी जगताप यांच्या नावाची चर्चा होती. मात्र आज (शुक्रवारी) सोशल मीडियावर माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या पत्नी नंदिनीदेवी जगताप यांच्या नावाचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ‘मिशन नगरपालिका २०२५ जनतेने दिलाय कौल’ एकच ध्यास करमाळा शहराचा सर्वांगीण विकास नगराध्यक्षा नंदिनीदेवी जगताप!’ अशा मजकुर यावर आहे. त्यामुळे जगताप गटाची उमेदवारी निश्चित झाली असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. सावंत गटाकडूनही मोहिनी सावंत यांचे नाव निश्चित असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्याही नावाची अधिकृत घोषणा झालेली नाही.
