करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व २० नगरसेवकासाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. सोमवारपासून (ता. १०) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून आज (मंगळवार) दुसऱ्या दिवशीही इच्छुक उमेदवारांचे अर्ज आलेले नाहीत. या निवडणुकीसाठी इच्छुकांना १७ तारखेपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी मात्र अनेक इच्छुक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी नगरपालिका कार्यालयात गर्दी होताना दिसत आहे. मात्र अजून प्रमुख गटांकडून व पक्षांकडून उमेदवाऱ्या जाहीर झालेल्या नसल्याने अर्ज दाखल झाले नसल्याची चर्चा आहे. उमेदवाऱ्या जाहीर झाल्यानंतर अर्ज दाखल होतील असे बोलले जात आहे.
करमाळा नगरपालिका क वर्ग दर्जाची आहे. या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुलाचे तहसीलदार दिनेश पारगे आहेत. तर सहाय्यक म्हणून मुख्याधिकारी सचिन तपसे आहेत. १० प्रभागातून ही निवडणूक होणार आहे. त्यासाठी २२ हजार ११६ मतदार आहेत. त्यात ११ हजार ६६ महिला, ११ हजार ४८ पुरुष व इतर २ मतदारांचा समावेश आहे. २७ मतदान केंद्रावर २ डिसेंबरला मतदान होणार आहे. नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण महिला असे आरक्षण आहे.
करमाळा नगरपालिका निवडणुकीत माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा जगताप गट, बागल गट व सावंत गट यांच्या भूमिका महत्वाच्या राहणार आहेत. भाजपने नगरपालिकेच्या निवडणुकीत ‘कमळ’ चिन्हावरच लढण्याचे जाहीर केले आहे. तर माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी महायुती म्हणून निवडणूक रिंगणात उतरण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत. उमेदवारी निश्चित झाल्यानंतर बागल, सावंत व जगताप गटाचे उमेदवार अर्ज दाखल करतील असे चित्र आहे.
निवडणूक लढवण्यासाठी २१ वर्ष वय पूर्ण असणे आवश्यक असणार आहे. अपक्ष उमेदवारासाठी ५ व पक्षाकडून निवडणूक लढवणाऱ्यासाठी १ सूचक आवश्यक आहे. सर्वसाधारण उमेदवाराला १ हजार, राखीव जागेवरील उमेदवाराला ५०० रुपये अनामत रक्कम ठेवण्यात आली आहे. राखीव जागेसाठी जातीचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. नगरपालिका कार्यालयाशेजारील श्री ज्ञानेश्वर वाचन मंदिर येथे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
