Video : करमाळ्याच्या शिवसेनेत नाराजी नाट्य! जगताप यांच्या निवडीवर बागल समर्थकांची नाराजी, शाखाप्रमुखांचा राजीनामा

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा व कुर्डुवाडी नगरपालिका निवडणुकीचे प्रभारी म्हणून माजी आमदार जयवंतराव जगताप यांची शिवसेनेने (शिंदे गट) निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली. मात्र या निवडीला विरोध करत करमाळ्यातील शिवसेनेचे नेते दिग्विजय बागल यांच्या समर्थकांमध्ये नाराजी नाट्य सुरु झाले आहे. पक्षातील पदाधिकारी विचारात घेत नसल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे. याचा किती परिणाम होणार हे पहावे लागणार आहे.

करमाळयाचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांची शिवसेना शिंदे गटाकडून नगरपालिका निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र त्यांची नियुक्ती होताच शिवसेना शिंदे गटात फूट पडल्याचं पहायला मिळत आहे. बागल गटाकडून सामूहिक राजीनामा देण्यात आला आहे. जगताप यांच्या नियुक्तीमुळे नाराज झालेल्या दिग्विजय बागल यांच्या गटातील 55 शाखाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. हा शिवसेना शिंदे गटासाठी निवडणुकीच्या तोंडावर धक्का मानला जात आहे. बागल समर्थक २० हजार सभासद आपले राजीनामे पोस्टाने पक्षश्रेष्ठींना पाठवणार आहेत.

आज करमाळा येथील बागल कार्यालयात शिवसेना शाखाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या सामूहिक राजीनाम्याचा काय परिणाम होणार हे पहावे लागणार आहे. दिग्विजय बागल यांनी शिवसेना शिंदे गटाकडून करमाळा विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यामुळे त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने पक्षात कार्यरत आहेत. माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नियुक्तीमुळे बागल यांच्या समर्थकांमध्ये नाराजी पसरली असून, आगामी निवडणुकीत बागल गटाला डावलले जात असल्याची भावना त्यांच्यात निर्माण झाली आहे. याच नाराजीतून हे सामूहिक राजीनामा नाट्य घडले आहे. या बैठकीस श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक सतीश नीळ, आशिष गायकवाड, राजेंद्र मोहोळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक कुलदीप पाटील, माजी संचालक आनंदकुमार ढेरे, रंगनाथ शिंदे, नवनाथ बदर, अशोक हनपूडे, संदीप शेळके, रवी शेळके, अक्षय सरडे, केशव बोराडे, विशाल शिंदे, आनंद टेकाळे, विजय काळे, प्रशांत पवार, संदीप हाके आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *