नाट्यमय घडामोडीत नगराध्यक्षासाठी सात अर्ज! करमाळ्यात तिरंगी की बहुरंगी लढत होणार?

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट), रासप व सावंत गटाचे नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. शेवटच्याक्षणी नाट्यमय घडामोडी घडवत भाजपने एबी फार्म देत नाराजी बंडखोरी रोखण्याचा प्रयत्न केला. तर शिवसेनेने मात्र सावध राहत सर्व ठिकाणी उमेदवार दिले आहेत. सावंत गटानेही बारकाईने लक्ष देऊन रणनीती आखली आहे. त्यामुळे ही निवडणूक भाजप, शिवसेना व सावंत यांच्यात प्रमुख लढत होईल. मात्र इतर अर्ज राहिले तर तिरंगी की बहुरंगी लढत होईल हे पहावे लागणार आहे.

करमाळ्यात राष्ट्रवादीचे १३ उमेदवार रिंगणात, भूमिकेकडे लक्ष

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) १३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या सूचनेनुसार महायुती धर्मपाळत या निवडणुकीत उरण्याचा निर्णय असल्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भारत अवताडे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी काय खेळी खेळली जाते का हे याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.

करमाळा नगरपालिकेची एक नगराध्यक्ष व २० नगरसेवक निवडण्यासाठी १० प्रभागातून निवडणूक होत आहे. माजी आमदार शिंदे यांनी सुरवातीलाच या निवडणुकीत महायुती म्हणून उतरण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ चिन्ह घेऊन बानू जमादार, अशपाक जमादार, स्वाती फंड, महादेव फंड, तेजल मोरे, ऋषिकेश शिगजी, गणेश माने, सुवर्णा जाधव, प्रशांत जाधव, धनश्री दळवी व सुहास ओहोळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेनी माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वात स्वतंत्र उतरण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांची यामध्ये महत्वाची भूमिका आहे. दुसरीकडे भाजपने सुनीता देवी यांना नगराध्यक्षपदी उमेदवारी दिली आहे. त्यांचे पती कन्हैयालाल देवी हे शिंदे समर्थक आहेत. काहीदिवसांपूर्वी त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. भाजपने त्यांना उमेदवारी दिली असून या निवडणुकीत सर्व ठिकाणी उमेदवार दिले असल्याने भाजप व राष्ट्रवादी एकत्र राहतील का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात केला जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी नेमका काय निर्णय घेईल हे पहावे लागणार आहे.


करमाळ्यात भाजप स्वतंत्र लढणार! देवींना उमेदवारीची लॉटरी, घुमरेंचा पत्ता कट, एक उमेदवार दोन ठिकाणी

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिका निवडणुकीत भाजपने स्वतंत्र लढण्याची तयारी केली असून सर्व जागांवर उमेदवार दिले आहेत. अर्ज मागे घेण्याच्यादिवशी वेगळे काय चित्र दिसेल का हे पहावे लागणार आहे. नगराध्यक्षपदासाठी कन्हैयालाल देवी यांच्या पत्नी सुनीता देवी यांचा अर्ज दाखल झालेला असून पक्षाने एबी फॉर्म देऊन त्यांच्या नावावर शिकामोर्तब केले आहे. शेवटच्याक्षणापर्यंत उमेदवारी मिळेल या आशेवर विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्या पत्नी जयश्री घुमरे होत्या. मात्र त्यांना डावलले असल्याचे चित्र आहे.

करमाळा नगरपालिकेची एक नगराध्यक्ष व २० नगरसेवक निवडण्यासाठी १० प्रभागातून निवडणूक होत आहे. या निवडणुकीत भाजपने सर्व जागांवर उमेदवार दिले आहेत. निवडणूक प्रभारी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी येथे कमळ फुलवायचे हा निश्चय केला आहे. त्यानुसार सर्व जागांवर उमेदवार दिले आहेत. मात्र निकाल काय येणार हे पहावे लागणार आहे. भाजपच्या महिला प्रदेशउपाध्यक्षा रश्मी बागल, शशीकांत चव्हाण, जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, तालुकाध्यक्ष रामा ढाणे, सचिन पिसाळ, शशिकांत पवार यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सर्व उमेदवारांचे एबी फॉर्म निवडणूक कक्षात दिले. यावेळी मात्र ज्या उमेदवारांचे एबी फॉर्म नव्हते त्यांच्यात नाराजी दिसली.

करमाळ्यात १० प्रभागात निवडणूक होत आहे. यामध्ये सपना घोरपडे, शौकत नालबंद, गोपाल वाघमारे, माया कांबळे, निर्मला गायकवाड, ताराबाई क्षीरसागर, स्वाती फंड, अतुल फंड, जबीनबानो कुरेशी, राहुल जगताप, श्रुती कांबळे, जगदीश अग्रवाल, सुषमा कांबळे, नितीन चोपडे, सुनीता ढाणे, दीपक चव्हाण, लत्ता घोलप, सचिन घोलप, रणजित कांबळे व जबीनबानो कुरेशी यांचे अर्ज दाखल झाले आहेत.

भाजपने या निवडणुकीत अतिशय सूक्ष्मपणे नियोजन केले असून शेवटच्याक्षणी उमेदवारांना एबी फॉर्म देऊन नावे निश्चित केली. कोणताही दगाफटका होणार नाही याची काळजी घेण्यात आली. बागल यांच्यासह विजय लावंड, सचिन घोलप, गणेश चिवटे, देवी, चव्हाण यांनी यामध्ये बारकाईने लक्ष घातले होते, असे बोलले जात आहे. सुरुवातीपासून बागल समर्थक भाजपमधील एक गट स्वतंत्र लढण्याचा आग्रह धरत होता. आता त्यांनी सर्व ठिकाणी उमेदवार दिले असून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला काही जागा दिल्या जातील का हे पहावे लागणार आहे. कुरेशी यांचा मात्र दोन प्रभागात अर्ज आहे.


शिवसेना स्वतंत्र : करमाळ्यात नगराध्यक्षपदी जगतापांची उमेदवारी कायम! तांबोळी पती- पत्नी रिंगणात

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या पत्नी नंदनीदेवी जगताप या पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. शिवसेनेच्या (शिंदे गट) त्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. नगरपालिकेच्या एका नगराध्यक्ष व २० नगरसेवक पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. या निवडणुकीत शिवसेना जगताप गटाच्या माध्यमातून स्वतंत्र निवडणूक रिंगणात उतरली आहे. यामध्ये जिल्हा प्रमुख महेश चिवटे व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंगेश चिवटे यांची भूमिका महत्वाची असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

विधानसभा निवडणूक झाल्यानंतर माजी आमदार जगताप यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर नगरपालिका निवडणुकीत शिवसेना स्वतंत्रपणे उतरली आहे. १० प्रभागातून जरीमुन्नीसा सय्यद, आशितोष शेलार, राजू वाघमारे, पल्लवी अंधारे, अल्ताफ तांबोळी, संगीता खाटेर, माधवी पोळ, चंद्रकांत राखुंडे, साजिदा कुरेशी, माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, सुवर्णा आल्हाट, माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे, अश्विनी अब्दुले, युवराज चिवटे, मीनल पाटोळे, ज्योतीराम ढाणे, अश्विनी घोलप, रोहित बालदोटा, निलेश कांबळे व शबाना तांबोळी हे २० उमेदवार रिंगणात आहेत.

शिवसेनेकडून माजी आमदार जगताप यांची करमाळा व कुर्डवाडी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे विधानसभा निवणुकीत शिवसेनेचे उमेदवार दिग्विजय बागल यांच्या समर्थकांनी पदाचा राजीनामा देत संताप व्यक्त केला होता. त्याचा किती परिणाम होणार हे पहावे लागणार आहे. मात्र सध्यस्थितीत शिवसेनेने स्वतंत्र उमेदवार देऊन निवडणुकीत उतरली आहे.

करमाळा तालुक्यात कायम गटाचे राजकारण चालत आले आहे. गेल्या निवडणुकीत जगताप व बागल एकत्र होते. मात्र त्यांची ही युती काही महिन्यातच तुटली होती. जगताप व बागल हे पारंपरिक विरोधक आहेत. बागल गटाच्या नेत्या सध्या भाजपात आहेत. दिग्विजय बागल हे काय करतील हे पहावे लागणार आहे. मात्र राज्यात महायुती असतानाही करमाळ्यात शिवसेना व भाजप वेगळे लढत असल्याचे चित्र आहे. सुरुवातीला जगताप गट संगीता खाटेर यांना उमेदवारी देतील असे वाटत होते. मात्र जगताप यांची उमेदवारी निश्चित केली आणि ती कायमही राहिली आहे. निकालात काय होणार हे पहावे लागणार आहे.

माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांच्या प्रभागात उमेदवारी डावलल्याने परदेशी परिवाराने बंडखोरी केली आहे. त्यांनी सावंत गटात प्रवेश केला आहे. मात्र त्याचा किती परिणाम होणार हे पहावे लागणार आहे. उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरीचा धोका होऊ नये म्हणून शेवटच्याक्षणी उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत. या निवडणुकीत तांबोळी पती पत्नी निवडणुकीत उतरले आहेत.

दरवाजा वाजवत संताप! करमाळ्यात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काम झाल्यानंतरही बाहेर जाऊ दिले नसल्याचा आरोप करत कक्षातच गोंधळ?

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिका निवडणूक निर्णय अधिकारी हे कोणाशीही समानव्य ठेवत नसल्याचा आरोप इच्छुक उमेदवारांचा आहे. नाव न छापण्याच्या अटीवर अनेक नागरिकांनी त्यांच्याबाबत माहिती दिली आहे. आज (समोवार) तर त्यांच्या भूमिकेमुळे संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक कक्षातच दरवाजा वाजवून त्यांचे लक्ष वेधले. मात्र बाहेर याबाबत उलटसुलट चर्चा असून निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश पारगे यांच्यात बदल होईल का नाही हा प्रश्न करमाळकरांना पडला आहे. याबाबत माहिती घेण्यासाठी कोणाला संपर्क साधायचा हाही प्रश्न आहे. निवडणूक निर्णय अधिकारी पारगे हे पत्रकारांशी संवाद साधत नाहीत. त्यामुळे नेमके खरं काय झाले हे समजने कठीण असून या प्रकराबाबत जोरदार चर्चा सुरु आहे.

नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. इच्छुक उमेदवारांची शेवटपर्यंत धावपळ झाल्याचे दिसले. बरोबर ३ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी पारगे यांनी दरवाजा बंद करण्याची सूचना दिली. तेव्हा निवडणूक कक्षात संबंधित उमेदवार, त्यांचे सूचक व इतर संबंधित पदाधिकारी उपस्थित होते. पारगे यांनी दोन्ही मुख्य दरवाजे बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिस बांधव व कर्मचाऱ्यांनी दरवाजा बंद केला. मात्र काही वेळात आतील काही नागरिकांचे काम झाले. त्यामुळे ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होते.

दरम्यान त्यांनी बाहेर पडण्यासाठी दरवाजा उघडण्याची विनंती केली. मात्र सर्वांचे काम झाल्याशिवाय बाहेर पडता येणार नाही, असे म्हणत निवडणूक पारगे यांनी दरवाजा उघडण्यासाठी विरोध केला. त्यानंतर तेथील काही व्यक्ती संतप्त झाल्या. ‘आतमध्ये स्वच्छतागृह नाही, पाणी नाही, असे असताना आमचे काम झाले आहे मग बाहेर जाऊद्या अशी विनवणी त्यांनी केली. मात्र तरीही पारगे यांनी दरवाजा उघडण्यास विरोध केल्याने’ त्यांनी दरवाजा वाजवला सुरुवात केली. त्याचा आवाज आणि मोठ्या आवाजात बोलले बाहेरही ऐकायला येऊ लागले. त्यामुळे बाहेर बंदोबस्तासाठी असलेले पोलिस बांधव आणि नागरिक हे देखील घाबरले. कारण आतमध्ये काय झाले हे बाहेर काहीच समजत नव्हते. त्यानंतर काही वेळातच दरवाजा उघडण्यात आला तेव्हा बाहेर पडलेल्या नागरिकांनी पारगे यांच्या भूमिकेला विरोध केला.

पारगे हे नागरिकांशी समन्वय ठेवत नाहीत, असा यापूर्वीही आरोप झालेला आहे. आज त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे निवडणूक कक्षातच गोंधळ झाला आहे. त्यांच्यात नियमात राहूनच सुधारणा होणे आवश्यक आहे, अशी भावना सर्वसामान्य नागरिकांची आहे. अर्जांची छाननी आणि माघार घेतेवेळी तरी त्यांनी योग्य नियोजन करावे किंवा कक्षात स्वच्छतागृह आणि महिलांसाठी व्यवस्था करावी, अशी अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *