करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रमुख तिरंगी लढत होईल असे चित्र आहे. मात्र शुक्रवारी (ता. २१) उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर याचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादीची (अजित पवार गट) मदत मिळावी यासाठी बैठकांचे सत्र सुरु असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. ज्या गटाला व पक्षाला राष्ट्रवादीची मदत मिळेल त्याचे बळ वाढणार असल्याची चर्चा आहे. जागा वाटपावर वरिष्ठ पातळीवर याबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.
करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र निवडणुकीत उतरली आहे. त्यांचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार नंदनीदेवी जगताप आहेत. भाजपनेही सर्व जागेवर उमेदवार दिले आहेत. त्यांच्या सुनीता देवी या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. तर सावंत गटदेखील या निवडणुकीत उतरला असून मोहिनी सावंत या त्यांच्या उमेदवार आहे. राष्ट्रवादीचे १३ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यांचा नगराध्यक्षपदावर उमेदवार नाही. त्यामुळे त्यांची काय भूमिका राहिले हे पहावे लागणार आहे.
राष्ट्रवादीला ८ जागा मिळाव्यात अशी मागणी असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजली आहे. त्यांचा पाठींबा मिळावा यासाठी प्रयत्न सुरु असल्याचेही समजत आहे. याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे व माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्यात चर्चा सुरु असल्याचे बोलले जात आहे. तर स्थानिक पातळीवर सावंत गट यांच्याशी चर्चा सुरु असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भारत अवताडे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, कन्हैयालाल देवी, सावंत गटाचे सुनील सावंत व इतर कार्यकर्ते यांची देखील चर्चा सुरु असल्याची खात्रीलायक माहिती आहे. यावर मात्र अधिकृतरीत्या कोण बोलायला तयार नसून राष्ट्रवादीची भूमिका ‘वेट अँड वॊच’ची असल्याचे समजत आहे.
