तू माझी पत्नी आहे असे सांगून वारंवार अल्पवयीन मुलीवर अत्याचार! प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर करमाळ्यात प्रकार उघडकीस, तिघांवर गुन्हा दाखल

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘तू माझी पत्नी आहे’, असे सांगून वारंवार शारीरिक संबंध ठेवले. त्यात पीडिता गरोदर राहिली. दरम्यान पीडितेला त्रास सुरु झाल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा संबंधित डॉक्टरांच्या लक्षात पीडिता अल्पवयीन असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पती, पीडितेची आई व विवाहास उपस्थित असलेल्या संशयितांविरुद्ध करमाळा पोलिस ठाण्यात पॉस्को व बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक गिरीजा मस्के यांच्या फिर्यादीनुसार हा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपासासाठी अक्कलकुवा (नंदुरबार) पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

उपलब्ध माहितीनुसार संबंधित गुन्ह्यातील पीडिता व त्यांचे कुटूंबिय उसतोडीचे काम करतात. करमाळा तालुक्यातील एका गावात ऊसतोडीसाठी हे कुटुंब आले. पीडिता उसाच्या मोळी बांधण्याचे काम करत होती. दोन दिवसांपूर्वी तिला त्रास होऊ लागला होता. म्हणून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा ती अल्पवयीन असल्याचे लक्षात आले. तिचा विवाह झाला होता. या विवाहास जबाबदार असणाऱ्यांवरही गुन्हा दाखल झाला आहे. तिच्या पतीने ‘तू माझी पत्नी आहे, असे सांगून ती अल्पयीन असल्याचे माहित असतानासुद्धा वारंवार शारीरिक संबंध ठेवले होते. त्यात ती गरोदर राहिली.’ सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपच्चार रुग्णालयात तिची प्रसूती झाली असून ती व तिचे बाळ सुरक्षित आहे. मात्र अल्पयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवणे व बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. त्यानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे. पती, आई व लग्नास जबाबदार असलेल्या संशयितांविरुद्ध हा गुन्हा दाखल झाला आहे.

करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी आयपीएस अंजना कृष्णा व पोलिस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनानुसार हा गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक मस्के या फिर्यादी आहेत. पुढील तपासासाठी अक्कलकुवा पोलिसांकडे हा वर्ग करण्यात आला आहे. ‘बालविवाह रोखण्यासाठी पोलिस सध्या ऍक्शन मोडवर आले आहेत. कायद्याचे उल्लंघन करून कोणीही असे गैरप्रकार करू नयेत’, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *