करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील पाथुर्डी येथील पत्रकाराच्या चोरीला गेलेल्या शेळ्यांचा शोध लागत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे या चोरीचा सीसीटीव्ही असूनही चोरटे मोकाट असल्याचा आरोप संबंधित पत्रकार फिर्यादीचा आहे.
पत्रकार शीतलकुमार मोटे यांच्या पाथुर्डी येथून चार महिन्यांपूर्वी अनोळखी चोरट्याने शेळ्या चोरून नेल्या होत्या. याबाबत गुन्हा दाखल झालेला आहे. मात्र अजूनही या चोरीचा तपास लागलेला नाही. या चोरीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असल्याचे मोटे सांगत आहेत. या घटनेनंतर तातडीने करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेच्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरीचा संपूर्ण प्रकार कैद झाला असून, त्यात चोरटे दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांना तपास करणे सोपे होईल, अशी अपेक्षा तक्रारदार मोटे यांनी व्यक्त केली होती. मात्र तसे न घडल्याने तक्रारदाराने याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता तर ‘चोरी होऊन चार महिने उलटले, गुन्हा दाखल आहे आणि सीसीटीव्हीमध्ये चोरटे दिसत असतानाही पोलीस चोरट्यांना का पकडत नाहीत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. या गुन्ह्याचा तपास लवकरात लवकर करून चोरट्यांना अटक करावी आणि चोरीस गेलेल्या शेळ्या परत मिळवून द्याव्यात, अशी मागणी तक्रारदार शितलकुमार मोटे यांनी वरिष्ठांकडे केली आहे.
दरम्यान ‘या गुन्ह्याचा तपास सुरु असून उपलब्ध सीसीटीव्ही पूर्ण क्लिअर दिसत नाही. त्यात गाडीचा क्रमांक दिसत नाही. जे संशयित होते त्यांची कसून चौकशी केली आहे. मात्र त्यांनी चोरी केली नसल्याचे स्पष्ट केले आहे. तपासत तसे काही उघडही होऊ शकलेले नाही. मात्र पोलिस अजूनही याचा तपास करत आहेत.’ असे स्पष्टीकरण करमाळा पोलिसांकडून देण्यात येत आहे.
