करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिकेवर साधारण ३० वर्षांपासून असलेले जगताप गटाचे वर्चस्व नुकत्याच झालेल्या निवडणूक निकालाने संपुष्टात आले आहे. या पराभवाची जनसामान्यात वेगवेगळी चर्चा केली जात असली तरी राजकीय जाणकारांमध्ये याला राजकीय रंग असल्याचे बोलले जात आहे. जगताप गटाचा हा पराभव नसून डावपेचात ‘करेक्क्ट कार्यक्रम’ (राजकीय) झाल्याचे सांगितले जात आहे.
करमाळा तालुक्यात आमदार नारायण पाटील यांचा पाटील गट, बागल गट, माजी आमदार संजयमामा शिंदे यांचा शिंदे गट व माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा जगताप गट यांच्या भूमिका कायम महत्वाच्या राहतात. येथे पक्षीय राजकारणापेक्षा गटाचे राजकारण मोठ्याप्रमाणात चालते. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती व नगरपालिकेवर जगताप गटाने त्यांचे वर्चस्व कायम ठेवले होते. मात्र मध्यंतरी बाजार समिती देखील जगताप गटाच्या ताब्यातून गेली होती. (मोठ्या राजकीय ‘राड्यात’ प्रा. शिवाजी बंडगर हे जगताप यांच्या विरोधात जाऊन सभापती झाले होते. प्रा. बंडगर हे कोणाकडून संचालक म्हणून विजयी झाले आणि कसे सभापती झाले हे आता नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही.) गेल्या बाजार समितीची निवडणूक बिनविरोध जगताप यांच्या ताब्यात देण्यात आली होती. तेव्हा माजी आमदार जयवंतराव जगताप, सावंत व माजी आमदार संजयमामा शिंदे एकत्र होते. तरीही मोहिते पाटील यांची मध्यस्थी यशस्वी झाली होती. तेव्हा आमदार नारायण पाटील व बागल यांचे अनेक कार्यकर्ते पुढे दिसत होते. मात्र आता नगरपालिका निवडणुकीत तसा एकोपा दिसला नाही. किंवा त्यांना यश आले नाही.
करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत जगताप गटाची सावंत गटाने ३० वर्षांची सत्ता उलथून लावली. जगताप गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. नगरपालिकेवर जगताप यांचे कायम वर्चस्व राहिले होते. मात्र या निवडणुकीत सर्वात कमी जागा त्यांच्या विजयी झाल्या असून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या पत्नी नंदनीदेवी जगताप व पुत्र माजी नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांचाही पराभव झाला. त्यांच्या या वर्चस्वालाच अक्षरशः सुरुंग लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
यापूर्वी जगताप गटाने करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीत अनेकदा स्थानिक पातळीवर युती आघाडी केली होती. या निवडणुकीच्या रिंगणात जगताप गट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या माध्यमातून स्वतंत्र उतरला होता. भाजप व सावंत (करमाळा शहर विकास आघाडी) यांच्यात तिरंगी लढत झाली होती. सावंत व जगताप हे एकत्र निवडणूक लढवतील अशी चर्चा सुरुवातीला होती. सावंत व जगताप यांनी एकत्र निवडणूक लढवावी, अशी जगताप समर्थक अनेक कार्यकर्त्यांची इच्छा देखील होती. मात्र माजी आमदार जगताप यांच्या जवळील काही मंडळींनी सावंत व जगताप यांच्या होणाऱ्या आघाडीत बिघाडी केली असल्याची चर्चा निकालानंतर सुरु झाली आहे. त्यात पाटील गटाच्या एका सूत्रधाराचेही नाव आघाडीवर आहे. (योग्यवेळी हे नाव समोर येणार) ‘त्यांना’च या पराभवाला अनेक निष्ठावंत जगताप समर्थक जबाबदार धरत आहेत.
१० प्रभागातून २० नगरसेवक व एक नगराध्यक्षपदासाठी झालेल्या या निवडणुकीत सावंत व जगताप एकत्र येतील अशी चर्चा होती. मात्र तसे झाले नाही. सावंत व जगताप या दोघांनीही लोकसभा निवडणुकीत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना विजयी करण्यासाठी काम केले होते. पुढे विधानसभा निवडणुकीत आमदार पाटील यांना विजयी करण्यात देखील त्यांची खूप मोठी मदत आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सावंत व जगताप यांनी माजी आमदार शिंदे यांची साथ सोडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार पाटील यांना मदत केली होती. दरम्यान माजी आमदार जगताप यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र स्थानिक निवडणुकीत पाटील यांच्याबरोबर असल्याचे जगताप यांनी अनेकदा स्पष्ट केले होते.
नगरपालिकेच्या निवडणुकीत एका सभेत आमदार पाटील हे येणार असल्याची चर्चा होती. त्याबाबत बॅनरवर त्यांचा फोटो देखील घेण्यात आला होता. मात्र पाटील करमाळ्यात आलेच नव्हते. तर खासदार मोहिते पाटील यांनी करमाळ्यात येऊन एका सभेत मार्गदर्शनही केले होते. विशेष म्हणजे सावंत गटाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या प्रभागात ही सभा झाली होती. पाटील यांचे करमाळा शहरात फारसे प्राभल्य नसल्याचे यावेळी बोलले गेले. त्यांच्या अनुपस्थितीबाबत स्पष्टीकरणही देण्यात आले. मात्र त्याच दरम्यान आमदार पाटील सांगोल्यात फडणवीस यांच्या सभेवेळी उपस्थित असल्याचे दिसले होते. करमाळ्यात आमदार पाटील यांचे प्रभल्य नसले तरी आमदार म्हणून त्यांची उपस्थिती वातावरण निर्मितीसाठी जगताप यांना महत्वाची ठरू शकली असती. मात्र ते आले नाहीत. त्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.
विधानसभा व लोकसभा निवडणुकीपूर्वी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली होती. तेव्हा जगताप, सावंत व शिंदे एकत्र होते. तेव्हा मोहिते पाटील यांच्या मध्यस्थीने ही निवडणूक बिनविरोध झाली होती. त्या निवडणुकीत सावंत यांचेही उमेदवारी अर्ज होते मात्र सावंत यांनी शेवटच्याक्षणी उमेदवारी मागे घेतली आणि ही निवडणूक बिनविरोध झाली होती. त्या निवडणुकीची समीकरण वेगळी असली तरी नगरपालिकेच्या निवडणुकीत सावंत आणि जगताप यांना एकत्र आणण्यासाठी मोहिते पाटील व आमदार पाटील यांनी मनापासून प्रयत्न केले का? आणि झाले असतील तर ते यशस्वी का झाले नाहीत? असे प्रश्न यानिमित्ताने केले जाऊ लागले आहेत. बागल व जगताप हे गेल्या नगरपालिका निवडणुकीत एकत्र होते. मात्र पुढे त्यांची युती टिकली नाही. बागल व जगताप हे पारंपरिक विरोधक समजले जातात. जगताप यांनी शिंदे यांची विधासभा निवडणुकीवेळीच साथ सोडली होती. जगताप यांनी मोहिते पाटील यांना लोकसभेसाठी व विधासनभेत मोहिते पाटील समर्थक आमदार पाटील यांना मदत केली होती. मात्र या नगरपालिका निवडणुकीत आमदार पाटील यांनी उघडपणे मदत केली असल्याचे दिसले नाही. त्याचीही चर्चा राजकीय जाणकार करू लागले आहेत.
जगताप यांचा पराभव कशामुळे? काय आहेत चर्चा?
- जगताप गटाचे प्रमुख माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या जवळच्या समजल्या जाणाऱ्या काही सल्लागारांनी त्यांना चुकीची माहिती दिली.
- सावंत यांच्याशी जुळवून घेणे आवश्यक होते.
- जगताप यांचा पाहिजे तेवढा जनसंपर्क राहिला नाही.
- अनेक वर्ष सत्ता असल्याने जगताप गटाविरुद्ध मतप्रवाह वाढला.
- प्रशासक काळात निर्माण झालेला आरोग्य, स्वच्छता, रस्ते, पाणी या प्रश्नाला जगताप गटाला सत्ताधारी म्हणून जबाबदार धरण्यात आले.
- विकास कामांबाबत नागरिकांची झालेली मानसिकता
- दलित व मुस्लिम मते विभागली.
याशिवाय जगताप यांच्या पराभवाचे काय कारण असेल. तुम्हाला काय वाटते?
