सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गट घड्याळ चिन्हावर लढवणार : उमेश पाटील

मोहोळ (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच जिल्हा परिषद गट व पंचायत समितीचे गण ‘घड्याळ’ चिन्हावरच लढवण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी केले. राष्ट्रवादीची (अजितदादा) सोलापूर जिल्हा कार्यकारिणी बैठक आज (शुक्रवार) मोहोळ येथील सावली निवास येथे झाली. यावेळी ‘संघटनात्मक बांधणी’, ‘निवडणूक तयारी आणि इच्छुक उमेदवारांच्या भूमिका’ यावर चर्चा झाली.

जेष्ठ नेते बळीरामकाका साठे, माजी आमदार संजयमामा शिंदे, प्रदेश प्रतिनिधी कल्याणराव काळे, डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, लतिफ तांबोळी, बाळासाहेब बंडगर, महिला जिल्हाध्यक्षा वर्षा शिंदे, युवती जिल्हाध्यक्ष ऋतुजा सुर्वे, युवक जिल्हाध्यक्ष अभिषेक आव्हाड, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष मोतीराम चव्हाण, अल्पसंख्यांक सेल जिल्हाध्यक्ष नजीर इनामदार, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भालशंकर तसेच करमाळा तालुकाध्यक्ष भारत अवताडे, अशापक जमादार आदी उपस्थित होते.

माढा, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, पंढरपूर, करमाळा, अक्कलकोट, मंगळवेढा, बार्शी, सांगोला, मोहोळ व माळशिरस या तालुक्यांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र आढावा बैठका देखील घेण्यात आल्या. यावेळी प्रत्येक तालुक्यातील राजकीय परिस्थिती, स्थानिक प्रश्न, कार्यकर्त्यांची ताकद आणि मतदारांचा कल याचा आढावा घेण्यात आला. याचवेळी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांकडून मागणी अर्ज स्वीकारण्यात आले.

पाटील म्हणाले, ‘संघटना मजबूत करणे, तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देणे आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणे हेच राष्ट्रवादीचे धोरण आहे. या बैठकीत आगामी निवडणुकांसाठी नियोजनबद्ध तयारी करून राष्ट्रवादीला सोलापूर जिल्ह्यात अधिक मजबूत करण्याचा निर्धार सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *