करमाळा (सोलापूर) : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत पाटील गटाकडून नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आमदार नारायण पाटील यांच्याकडून या निवडणुकीबाबत तयारी सुरू आहे. योग्यवेळी गटात इनकमिंग होणार असल्याचेही, सुनिल तळेकर यांनी यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे सांगितले आहे.
तळेकर म्हणाले, ‘जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यावर तालुक्यातील नागरिक ठाम राहून आमदार पाटील यांच्या पाठीशी राहतील. या निवडणुकीतही आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीप्रमाणे नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. सर्वांना बरोबर घेऊन सामाजिक समतोल जपण्याचे काम या निवडणुकीत पाटील गटाकडून केले जाणार आहे.’
पाटील गटात प्रवेश करण्यासाठी अनेकजण इच्छुक असुन निवडणुक काळात इन कमिंगवर भर देऊन विकासाच्या मुद्द्यावर सहमत होऊन कोणी आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्यास पाटील गटात स्वागत असणार आहे. युती आघाडीचा निर्णय घेण्याचे अधिकार आमदार पाटील यांना असणार आहे. सध्या संभाव्य उमेदवारांच्या नावांवर चर्चा सुरु आहेत. या निवडणुकीत कोणा बरोबर आघाडी करावयाची, कोणत्या पक्षाच्या चिन्हावर निवडणुक लढवायची की अपक्ष लढायचे यावर अजून निर्णय झालेला नसुन करमाळा मतदार संघातील एक प्रमुख राजकीय गट म्हणुन पुर्ण ताकदीने आमदार पाटील यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीत उतरण्याची तयारी पाटील गटाने सुरू केली असल्याचे, तळेकर यांनी म्हटले आहे.
