कोणाचा राग मुलांवर काढला? जुळ्या बहीण- भावंडांना विहिरीत ढकलून बापाचा आत्महत्येचा प्रयत्न

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात थरकाप उडवणारी धक्कादायक घटना घडली आहे. केत्तूर येथील एकाने पोटच्या दोन जुळ्या बहिण- भावंडांना विहिरीत ढकलून दिल्याचा प्रकार उघडकीस आला असून यामध्ये दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. मुलाचे नाव शिवांश सुहास जाधव व मुलीचे नाव श्रेवा सुहास जाधव (दोघांचेही वय 8) होते. बापाचे नाव सुहास ज्ञानदेव जाधव (वय ३२) असल्याचे समजत आहे. त्यानेही विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो झरे येथील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या उपकेंद्रात कार्यरत होता, असे सांगितले जात आहे. नेमका हा प्रकार कशामुळे झाला आहे हे समजू शकलेले नाही.

जाधव हा मूळचा हिंगणी येथील असून तो केत्तूर येथे राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार आज (शनिवार) सकाळी घरात किरकोळ घडलेल्या घटनेतून त्याला राग आला. त्यानंतर तो दोन्ही चिमुकल्या मुलांना शेतात घेऊन गेला आणि तेथेच त्यांना विहिरीत ढकलून दिले. त्यानंतर काही वेळाने त्यानेच स्वतः घरी फोन करून हा प्रकार सांगितला. त्यानंतर सर्वजण विहिरीकडे धावत गेले मात्र तोपर्यंत चिमुकल्यांचा जीव गेला होता. विहिरीच्या बाजूलाच विषाचीही बाटली सापडली, असे सांगितले जात आहे. या घटनेची माहिती समजताच पोलिस निरिक्षक रणजित माने, पोलिस उपनिरीक्षक बनकर यांनीही घटनास्थळी दाखल झाले आहेत.

घटनेची माहिती समजल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी अनेकांनी धाव घेतली. दरम्यान विहीरत पाण्यावर तरंगताना श्रेवाचा मृतदेह दिसला. त्यानंतर स्थानिकांनी शिवांशच्या मृतदेहाचा पाण्यात बुड्या शोध घेतला. दुपारी साधारण साडेतीन वाजताच्या दरम्यान हे मृतदेह काढण्यात आला. यासाठी केत्तूर येथील नितीन पत्तुले, सागर चमरे, दादासाहेब पतुले, राम चमरे, परशुराम भोई आदी मच्छीमार बांधवांनी मोठे परिश्रम घेतले. मृत्यदेह शवविच्छेदनासाठी करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथे सायंकाळी दाखल झाले. करमाळा पोलिसांकडून पुढील प्रक्रिया सुरु होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *