करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्याच्या पश्चिम भागाचे नेते म्हणून बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांची राजकारणात ओळख आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे ते अतिशय विश्वासू मानले जातात. करमाळ्यात स्थानिक पातळीवर ते माजी आमदार संजयमामा शिंदे यांचे समर्थक आहेत, असे बोलले जाते. मात्र गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमदार नारायण पाटील यांना विजयी करण्यासाठी काम केले होते. मात्र पाटील आणि गुळवे यांचे विधानसभेत झालेले मनोमिलन फार काळ टिकले नाही. आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीपासून त्यांनी आमदार पाटील यांची साथ सोडून पुन्हा माजी आमदार शिंदे यांच्याबरोबर ते दिसत आहेत. त्यामुळे शिंदे यांची ताकद वाढली आहे. मात्र होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत यांचा परिणाम दिसेल का हे पहावे लागणार आहे.
कोण आहेत सुभाष गुळवे?
करमाळा तालुक्यातील टाकळी हे गुळवे यांचे गाव आहे. हे गाव करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागात येते. त्यांचे तालुक्यातील प्रत्येक गटाच्या अनेक कार्यकर्त्यांशी चांगले सबंध आहेत. त्यांनी आदिनाथ सहकारी साखर कारखाना व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले होते. जिल्हा परिषदेत काम करताना त्यांनी करमाळा तालुक्यात विविध गावात विकास कामे केली. सर्वसामान्य शेतकरी यांना जिल्हा परिषदेच्या योजना मिळवून दिल्या. तीर्थक्षेत्र विकास आराखडा व पाणंद रस्ते अशी अनेक कामे त्यांनी केली. पुढे पवार कुटुंबियांच्या माध्यमातून त्यांनी बारामती ऍग्रो या कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले. तालुक्यातील साखर कारखाने बंद असताना असताना त्यांचा मोठा आधार शेतकऱ्यांना झाला.
करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे सहकाराचे मंदिर म्हणून ओळख असलेला श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना लिलावात निघाल्यानंतर बारामती ऍग्रोने हा कारखाना भाडेतत्वावर घेण्याचा निर्णय झाला. त्यात न्यायालयीन प्रक्रियेतही हा कारखाना बारामती ऍग्रोकडे गेला होता. अनेक शेतकऱ्यांनी ‘पवारच हा कारखाना व्यवस्थित चालवू शकतील’, अशी भावना व्यक्त केली होती. माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी तर ‘पवारांशिवाय ब्रह्मदेव आला तरी हा कारखाना सुरु होऊ शकणार नाही’, असे विधान केले होते. मात्र यात राजकारण झाले आणि हा कारखाना त्यांच्याकडे जाण्यापासून रोखला. पुढे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ यांच्या हस्ते या कारखान्याची मोळी टाकून हंगाम सुरु झाला. मात्र पुढे काय झाले हे सर्व ज्ञात आहेच. असो… त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. तेव्हा गुळवे यांनी आमदार पाटील यांना विजयी करण्यासाठी मदत केली होती.
आमदार पाटील यांची साथ का सोडली?
बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांच्या म्हणण्यानुसार वरिष्ठांचा आदेश पाळून विधानसभा निवडणुकीत आमदार नारायण पाटील यांना साथ दिली. त्यांच्या विजयात आमचा हातभार आहे. मात्र त्यानंतर झालेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार पाटील यांनी आम्हाला विश्वासात घेतले नाही. आमदार रोहित पवार यांच्या विरोधात असलेले भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांच्या माध्यमातून त्यांनी पॅनल केला. आमच्या विरोधात काम केलेल्या व्यक्तींना उमेदवारी दिली. त्यामुळे आम्ही माजी आमदार शिंदे यांच्या माध्यमातून आदिनाथला निवडणुकीत उतरलो. या निवडणुकीत आमचा पराभव झाला असला तरी आमच्या गटातून मताधिक्य दिले होते. हा कारखाना सुरु होणे आवश्यक आहे. आम्हाला विचारात घेतले असते तर आम्हीही मदत केली असती. मात्र आमच्या विरोधात काम झाले. विश्वासातही घेतले नाही. त्यानंतरही आमच्या भागात निधी दिला नाही. कामे करताना विश्वासात घेतले नाही.’
सध्या काय?
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत माजी आमदार शिंदे यांच्याबरोबर गुळवे दिसत आहेत. माजी आमदार शिंदे यांचा निवडणुकीच्या निमित्ताने तालुक्यात दौरा झाला. त्याची सुरुवात टाकळी येथून झाली. यावेळी मोठी गर्दी झाली होती. पुढे गुळवे हे करमाळा येथे झालेल्या शिंदे यांच्या मेळाव्यात दिसले. तेव्हाही शिंदे यांच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
शिंदेंना किती फायदा होणार?
विधानसभा निवडणुकीत माजी आमदार शिंदे यांची माजी आमदार जगताप, सावंत व गुळवे यांनीही साथ सोडली होती. मात्र गुळवे हे पुन्हा माजी आमदार शिंदे यांच्याबरोबर आले आहेत. कोर्टी गटातून गुळवे यांच्या पत्नी वनिता गुळवे यांचे नाव चर्चेत आहे. त्यांना उमेदवारी मिळाली तर टप फाईट होऊ शकते? अशी चर्चा आहे. याशिवाय तालुक्यात गुळवे यांची कारखान्याच्या माध्यमातून असलेली यंत्रणा याचाही फायदा शिंदे यांना होऊ शकतो. मात्र निवडणुकी नंतरच हा फायदा समजणार आहे. स्थानिक पातळीवर गुळवे यांच्यामुळे काही कार्यकर्ते नाराज असल्याची माहिती आहे, तत्यांची समजूत घातली जाणार का? यावर बरीच समीकरणे अवलंबुन राहतील, असेही बोलले जात आहे.
पाटील गटावर काय परिणाम?
करमाळा तालुक्याच्या राजकारणात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार नारायण पाटील यांचा पाटील गट मोठा आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत बरोबर असलेले आणि पवार कुटुंबियांचे विश्वासू म्हणून ओळख असलेले सुभाष गुळवे यांनी त्यांची आमदार असतानाही साथ सोडली आहे. हा मॅसेज यातून जात आहे. ‘विकास कामांवरून’ पाटील गटाचे विरोधक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात गुळवे यांच्या जाण्याने अधिक भर पडू शकते, अशी चर्चा आहे. मात्र याचा परिणाम निवडणूक निकालानंतरच दिसणार आहे.
