करमाळा (अशोक मुरूमकर) : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत एकत्र आलेले बागल (भाजप) व शिंदे (उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी) यांची आज (शुक्रवार) पहिली संयुक्त पत्रकार परिषद झाली. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भारत अवताडे यांच्या कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेत माजी आमदार संजयमामा शिंदे, भाजपच्या नेत्या रश्मी बागल व युवा नेते दिग्विजय बागल यांनी भूमिका मांडली. यावेळी बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी जगताप, माजी संचालक चंद्रकांत सरडे, मकाईचे संचालक सतीश नीळ, उद्धव माळी, वाशिंबेचे सरपंच तानाजी झोळ, सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल आदी उपस्थित होते.
काय सांगितले पत्रकार परिषदेत?
माजी आमदार शिंदे व बागल हे करमाळा तालुक्याच्या राजकारणात पारंपरिक विरोधक आहेत. शिंदे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे निवडणूक प्रभारी आहेत. अजितदादांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे. तर रश्मी बागल या भाजप महिला प्रदेशच्या उपाध्यक्षा आहेत. पांडे जिल्हा परिषदेच्या गटात त्या स्वतः उमेदवार आहेत. तर दिग्विजय बागल हे भाजपचे युवा नेते म्हणून ओळखले जातात.तिघांनीही एकत्र येण्याबाबत भूमिका मांडल्या. तिघांचाही सूर विकास कामे करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार एकत्र आल्याचा होता. पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांची कामे करता येतात. त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही एकत्र आलो आहोत. असं सांगण्यात आले.
कोणाची मध्यस्थी झाली?
पालकमंत्री जयकुमार गोरे यांची यामध्ये मध्यस्थी यशस्वी झाली आहे. बागल यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे झाले होते. ते माजी आमदार शिंदे यांचे उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी यासाठी बोलणे झाले होते. त्यानंतर पालकमंत्री गोरे यांच्या माध्यमातून एकत्र आल्याचे त्यांनी सांगितले.
विधानसभेचे काय गणित?
जिल्हा परिषद व पंचायत समितीला मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते. येथून नागरिकांचे प्रश्न सोडवण्यास मोठी मदत होती. दोन्ही पक्षाचे कार्यकर्त्यांना यामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. विधानसभा निवडणुकीची एकत्र येताना कोणतीही चर्चा झालेली नाही.
जागेचे वाटप कसे?
जिल्हा परिषदेच्या करमाळ्यात सहा गट व पंचायत समितीचे १२ गण आहेत. यामध्ये फिप्टी- फिप्टीचा फॉर्म्युला ठरलेला आहे. जागा वाटपात दोघांचीही कोठेही अडचण झाली नाही. त्यामुळे सहमतीनेचे एकत्र आले आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन उमेदवार विजयी करण्यासाठी काम करावे, असे आवाहन करण्यात आले.
बंडखोरीबाबत काय?
दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना समान जागा मिळाल्या आहेत. इच्छुकांची संख्या जास्त आहे हे खरंय मात्र येथे विजय महत्वाचा आहे. त्यामाध्यमातून सर्वांची कामे करता येणार आहे. सर्वांची नाराजी दूर केली जाईल. त्यासाठी दोन्ही गटाचे नेते बसून चर्चा करतील, असे सांगण्यात आले.
काय होणार परिणाम?
बागल व शिंदे यांनी एकत्र यावे अशी अनेक कार्यकर्त्यांची इच्छा होती. आता आम्ही एकत्र आलो आहोत त्यामुळे त्याचा निश्चितच चांगला परिणाम दिसेल, असे सांगण्यात आले.
