करमाळा : ‘गावासह वाड्यावस्त्यांचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषद हे महत्वाचे माध्यम असून सर्व कार्यकर्त्यांनी मतभेद बाजूला ठेऊन राष्ट्रवादी व भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करा’, असे आवाहन माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी रावगाव येथे केले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांच्या प्रचारानिमित्त रावगाव येथे शिंदे व बागल गटाचा कार्यकर्ता मेळावा झाला. यावेळी पांडे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार रश्मी बागल यांच्यासह दोन्ही गटातील बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. माजी आमदार शिंदे म्हणाले, ‘करमाळा तालुक्यातील माझा कार्यकाळ खूप कमी आहे. २०१४ पासून मी येथे सक्रिय झालेलो आहे. मात्र तेव्हापासून येथे विकास कामाला प्राधान्य दिले आहे. कधीही चुकीचे काम केले नाही. भविष्यात कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी मिळावी म्हणून दोन्ही गट एकत्र आले आहेत. एकत्र येणे ही अनेक कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशाने राष्ट्रवादी व भाजप एकत्र आले आहेत. त्यातून आपण उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. त्यांना काम करण्याची संधी द्या’, असे आवाहन त्यांनी केले.
पुढे बोलताना माजी आमदार शिंदे म्हणाले, ‘श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी येथे मुक्कामाला असते त्यामुळे येथे कायमस्वरूपी सोईसुविधा वारकऱ्यांना मिळाव्यात यासाठी आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केला जाईल. याशिवाय येथील शासकीय विहिरींचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवलेला असून तोही मंजूर करून घेऊ. जलजीवन मिशनमध्ये वाढीव भागाचा समावेश केला जाईल’, असेही आश्वासन माजी आमदार शिंदे यांनी दिले. करमाळा तालुक्यातील कुकडीचे व मांगीचे पाणी याबाबतही त्यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे. भाजपच्या नेत्या रश्मी बागल यांनीही सरकारकडे तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
कार्यकर्त्यांध्ये उत्साह
माजी आमदार संजयमामा शिंदे, भाजपच्या नेते दिग्विजय बागल व पांडे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार रश्मी बागल यांनी रविवारी देलवडी, वीट, बोरगाव येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. करमाळ्यात माजी आमदार शिंदे, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, बागल यांनी भाजपचे नेते गणेश चिवटे यांच्या निवासस्थानी वीट जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार अश्विनी चिवटे यांच्या प्रचारार्थ अनेक कार्यकर्त्यांशी सवांद साधला. शिंदे व बागल जिल्हा परिषद निवडणुकीत एकत्रित आले आहेत. त्यांच्या एकत्र येण्याला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या एकत्रित येण्याने कार्यकर्त्यांमध्येही उत्साह असल्याचे दिसत आहे.
