करमाळा : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी करमाळा तालुक्यामध्ये राजकीय भूकंप झाला परंतु भूकंपाचे केंद्रबिंदू होते बार्शी अर्थातच माजी आ. राजाभाऊ राऊत यांचे कार्यालय .बार्शीचे माजी आ. राजाभाऊ राऊत यांच्या पुढाकाराने माजी आ. जयवंतराव जगताप व रश्मी बागल यांच्यात लक्ष्मी सोपान मार्केट येथे एक बैठक पार पडली.या बैठकीत जगताप गटाने भाजप – राष्ट्रवादी काँग्रेस युतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते . येत्या दोन दिवसात करमाळा येथे पालकमंत्री जयकुमार गोरे व माजी आमदार राजाभाऊ राऊत यांच्या उपस्थितीमध्ये जगताप, बागल व शिंदे यांच्या एकत्रित पत्रकार परिषदेद्वारे याची अधिकृत घोषणा होणार असल्याचे समजते .या घटनेमुळे करमाळा तालुक्याच्या राजकीय पटलावर भूकंप अनुभवयास मिळाला .जगताप यांच्या या निर्णयामुळे करमाळा तालुक्याचे संपूर्ण राजकीय समीकरणच बदलले आहे . याचा जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीत भाजप -राष्ट्रवादी युतीला फायदा होणार आहे .नुकताच करमाळ्याचे माजी आ. जयवंतराव जगताप यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये आपण तटस्थ राहणार असून मतदारांनी योग्य उमेदवाराला मतदान करावे असा सर्वांनाच अचंबित करणारा निर्णय जाहीर केला होता .परंतु भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने या संधीचा फायदा घेत जगताप यांच्याशी संपर्क साधला होता . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीने पालकमंत्री गोरे व माजी आ. राऊत यांच्या पुढाकाराने जगताप ,शिंदे व बागल यांच्या गटात समेट घडून आल्यामुळे व माजी आ.जगताप यांनी भाजप -राष्ट्रवादी युतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचे निर्णयामुळे भाजप – राष्ट्रवादीचे पारडे निश्चितच जड झालेले आहे . जिल्ह्याच्या राजकारणातील समविचारी नेत्यांचे समन्वयक म्हणून ओळख असलेले व जगताप यांच्याशी बंधुतुल्य ऋणानुबंध जोपासलेले माजी आ. राजाभाऊ राऊत यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या संमतीने माजी आ. संजयमामा शिंदे, रश्मी बागल व माजी आ.जयवंतराव जगताप यांच्यात राजकीय ऐक्य घडविण्यात यश आले .यामुळे जिल्ह्याच्या राजकीय राजधानीचे व समन्वयाचे केंद्र म्हणून बार्शी नव्याने उदयास येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे .
करमाळा तालुक्यात राजकीय भूकंप! माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा भाजप- राष्ट्रवादी युतीला बिनशर्त पाठिंबा
