करमाळा (सोलापूर) : ‘विरोधक कोण काय म्हणत आहेत याकडे मी लक्ष देत नाही. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आम्ही विकासाच्याच मुद्द्यावर लढणार आहोत’, असे म्हणत माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी भाजप व राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) सर्व उमेदवारांना विकास करण्यासाठी विजयी करा, असे आवाहन केले आहे.
माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी आज (रविवार) साडे गणात दौरा केला. सालसे येथे दशरथ घाडगे यांच्या निवासस्थानी त्यांनी कार्यकर्त्यांशी सवांद साधला. यावेळी विलास राऊत यांच्यासह केम जिल्हा परिषद गटातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. माजी आमदार शिंदे म्हणाले, ‘आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाल्याने दुःखाच्या सावटात प्रचार सुरु आहे. आम्ही मोठ्या सभा घेणार नाहीत. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींच घेत आहोत. अजितदादांनी आम्हाला विकासासाठी खूप मोठे बळ दिले आहे. विकासाचे राजकारण करायचे ही आम्हाला शिकवण आहे. होत असलेल्या निवडणुकीत आपल्या उमेदवारांना विजयी करा’, असे आवाहन यावेळी त्यांनी केले.
पुढे बोलताना माजी आमदार शिंदे म्हणाले, ‘विधानसभा व श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत झालेली चूक आता करू नका. मी विकासाचे राजकारण करत असल्यामुळे गेल्या काही निवडणुकीत मला एकटे पाडण्याचा प्रयत्न झाला. मात्र तुमच्याच पाठबळामुळे मी या निवडणुकीत आलो आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची असलेल्या दहिगाव उपसासिंचन योजनेच्या बंद नलिकेसाठी आपण निधी मिळवला. प्रशासकीय भवनाचे भूमिपूजन अजितदादा यांच्या हस्ते झाले होते. डिकसळ पुलासाठी निधी मिळवला. मात्र विरोधकांनी विकास कामे बंद पडली. याची उत्तर दिली जातील का?’ असाही प्रश्न त्यांनी केला आहे.
