महायुतीची वज्रमुठ अन जगताप यांच्या पाठिंब्यामुळे भाजपा- राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होणार : बागल

करमाळा (सोलापूर) : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुतीची वज्रमुठ अन माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या पाठिंब्यामुळे भाजपा- राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी होणार, असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल यांनी व्यक्त केला आहे.

विधानसभा निवडणूक व त्यानंतर झालेल्या आदिनाथ कारखाना आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये बिघाडी निर्माण झाल्यामुळे त्याचा फायदा महाविकास आघाडीने घेतला आणि त्यांनी विजय संपादन केला. या उलट जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये परिस्थिती निर्माण झाली असून भाजपा व राष्ट्रवादीची (अजित पवार गट) युती झाल्यामुळे महायुतीची ताकद वाढली आहे. त्यातच महाविकास आघाडीचे तुकडे होऊन राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) काही उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. काही उमेदवारांनी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे. महाविकास आघाडीमधील माजी आमदार आमदार जयवंतराव जगताप यांनी आमदार नारायण पाटील यांना सहकार्य करून आमदार करण्यामध्ये मोलाची भूमिका बजावली होती. त्यात जगताप यांनीही महायुतीला पाठिंबा दिलेला आहे. ते प्रचाराच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. यामुळे करमाळा तालुक्यात इतिहास घडणार असून ९ तारखेला राष्ट्रवादी (अजित पवार गट) व भाजपचे सर्व उमेदवार विजयी होणार असल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते बागल यांनी केला आहे.

आदिनाथ सहकारी साखर कारखान्यांमधून सोन्याचा धूर काढू असे दिलेले आश्वासन हवेत विरल्यामुळे सभासदांचा विश्वासघात झालेला आहे. दीड वर्ष आमदारकीला पूर्ण होऊनही दीड रुपयाचाही निधी मतदार संघामध्ये आलेला नाही. यामुळे सर्वसामान्य मतदारांचा विश्वासघात झालेला आहे. ज्यांच्या पाठिंब्यामुळे आमदारकी मिळाली त्याच नेतृत्वाला झिडकारल्यामुळे आमदारांची प्रतिमा मलीन झालेली आहे. याचा परिणाम येत्या निवडणुकीत निश्चितच दिसणार आहे, असेही बागल यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *