करमाळा (सोलापूर) : यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये डॉ. कैसरजहाँ लिखित ‘अब्बा बरोबर आहेत’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. महाविद्यालयाच्या विजयश्री सभागृहामध्ये हे प्रकाशन झाले.
आजच्या काळात आई- वडील आणि एकत्र कुटुंब पद्धती किती महत्त्वाची आहे. त्यामुळेच पुढील पिढी संस्कारशील घडू शकते. ‘अब्बा बरोबर आहेत’ या वडिलांवरच्या पुस्तकावरून लक्षात येते की आपल्या जीवनामध्ये वडील हे पात्र किती महत्त्वाचे आहे. त्यामुळे मराठी साहित्यामध्ये अब्बा बरोबर आहेत या डॉ. कैसरजहाँ लिखित पुस्तकामुळे मोलाची भर पडली आहे, असे प्रतिपादन या पुस्तकाच्या प्रकाशनाच्यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव व प्रसिद्ध कवी श्री शिवाजी शिंदे यांनी केले.
या पुस्तकाच्या लेखिका डॉ. कैसरजहाँ यांनी आपल्या वडिलांची महती सांगताना आपला जीवनपट उलगडून सांगितला व एका सामान्य शिक्षकाने पुढची पिढी कशी घडवली आणि त्यांना जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी कसे मार्गदर्शन केले. हे त्यांच्या मनोगतातून सांगितले म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये वडिलांची जागा कोणीही घेऊ शकत नाही त्यामुळे ते सर्वोत्तम असतात म्हणून त्यांना आपण बापमाणूस म्हणतो असे डॉ. कैसरजहाँ यांनी आपल्या पुस्तकाविषयी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे होते. यावेळी इंद्रजीत घुले, डॉ. राजेंद्र दास यांनी मनोगते व्यक्त केले. सुरेश शिंदे, संस्थेचे विश्वस्त चंद्रशेखर शिलवंत, अजयकुमार भोसले, सिमरन भोसले, डॉ. अश्विन अंबी, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अभिमन्यू माने, कनिष्ठ विभागाचे प्रशासन अधिकारी संभाजी किर्दाक उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. मुक्ता काटवटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. विष्णु शिंदे यांनी तर आभार सिमरन भोसले यांनी मानले.
