करमाळा (सोलापूर) : निराधारांचे मातृत्व स्वीकारत ‘जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा’ या भावनेतून काम करणारे गणेश चिवटे यांचे कार्य प्रेरणादायी आहे, असे मत माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी व्यक्त केले.
श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंतीनिमित्त 2018 मध्ये सुरू करण्यात आलेल्या निराधारांसाठीच्या अन्नदान उपक्रमाचा नवव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमासाठी हभप नाना महाराज पांडेकर, संत साहित्याचे अभ्यासक ॲड. डॉ. बाबुराव हिरडे, माजी नगराध्यक्ष अमोदशेठ संचेती, उपनगराध्यक्ष अतुल फंड, नगरसेवक प्रशांत ढाळे, रामभाऊ ढाणे, अफसर जाधव, वीट पंचायत समितीचे सदस्य दिलीप ढेरे, हिसरे पंचायत समिती सदस्य भरत आवताडे, मानसिंग खंडागळे , श्रेणिक खाटेर आदी उपस्थित होते.
माजी आमदार जगताप म्हणाले, श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश चिवटे हे नऊ वर्षांपासून निराधारांना अन्नदान करत आहेत. केवळ अन्नदानच नव्हे तर त्यांनी निराधारांचे मातृत्व स्वीकारत त्यांना आपलेपणाची ऊब दिली आहे. ही सेवा केवळ उपक्रम नाही ती एक साधना आहे. ज्यांच्या मनात खऱ्या अर्थाने करुणा आणि प्रामाणिकपणा असतो, त्यांच्याच हातून असे कार्य घडते, असे ते म्हणाले.
विद्यार्थ्यांना मोफत भात- भाजी वाटप, गोरगरिबांसाठी सामुदायिक विवाह सोहळा तसेच विविध सामाजिक उपक्रमांमधून त्यांनी समाजसेवेचा वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
ॲड. डॉ. बाबुराव हिरडे यांनी संत साहित्याचा संदर्भ देत सेवा, दया आणि परोपकार हीच खरी ईश्वरभक्ती असल्याचे प्रतिपादन केले. निराधार, गरजू आणि वंचित घटकांना आधार देणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले.
हभप नाना महाराज पांडेकर यांनी शिवजयंतीचा संदेश कृतीतून साकार करण्याचे आवाहन केले. श्रीराम प्रतिष्ठानचा अन्नदान उपक्रम हा समाजातील सकारात्मक परिवर्तनाचा मार्ग असल्याचेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीराम प्रतिष्ठानचे संचालक भीष्माचार्य चांदणे यांनी केले.
चिवटे म्हणाले ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे अवचित्य साधनु आम्ही त्यांचे विचार आत्मसात करून हा छोटेखानी सुरू केलेला उपक्रम आज सर्वांच्या सहकार्याने मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतरित झाला आहे. आजपर्यंत आम्ही अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून एक लाख चाळीस हजार डब्यांचे वाटप केले आहे. भविष्यात अन्नदानाबरोबरच निराधारांसाठी निवाऱ्याची उभारणी करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. भगवान गिरी यांनी केले तर आभार जय श्रीराम विलास जाधव यांनी मानले.
