करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा शहरात तीन दिवसांपासून हवा प्रदूषित झाली आहे. उग्र वास येत असल्याने नागरिकांना मोकळा श्वास घेता येत नसल्याच्या तक्रारी येऊ लागल्या आहेत. याबाबत नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र हा वास नेमका कशाचा आहे हे समजू शकलेले नाही. नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून आता याचा शोध सुरु झाला आहे. तर ‘या वसापासून काळजी घेण्याचे’ आवाहन तज्ञांकडून केले जात आहे.
करमाळा शहरात तीन दिवसांपासून वेगळाच वास येत असल्याने हवा प्रदूषित झाली आहे. चिमुकली देखील या वासांमुळे हैराण झाले आहेत. श्वसुश्वासाचा त्रास असणाऱ्या नागरिकांना देखील याचा मोठा त्रास जाणवू लागल्याच्या चर्चा आहेत. याकडे गांभीर्याने लक्ष देण्यात यावे अशी मागणी केली जात आहे. तहसीलदार शिल्पा ठोकडे म्हणाल्या, ‘वास नेमका कशाचा येत आहे हे शोधण्यासाठी संबंधित विभागांना सूचना दिल्या आहेत.’ करमाळा नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक विपुल पुजारी म्हणाले, ‘करमाळ्यात नेमका कशाचा वास येत आहे याचा शोध सुरु आहे. हा वासच कशाचा आहे हे समजल्यावर उपाययोजना केल्या जातील.’
काय घ्याल काळजी?
स्त्रीरोग तज्ञ डॉ. कविता कांबळे म्हणाल्या, ‘वास कोणत्याही प्रकारचा असला तरी मानवी शरीरावर त्याचा परिणाम होतो. अनेकांना अत्तरचा देखील वास सहन होत नसतो. त्याची ऍलर्जी काहींना असते. उग्रवास असेल तर त्याचा सर्वांना त्रास होतो. त्यामुळे नाक, घसा व फुफुसाशी संबंधित आजार निर्माण होऊ शकतात. कोंढल्यासारखे होणे व त्यानंतर वेगवेगळे आजार होणे. त्यामुळे नेमका हा वास कशाचा आहे हे शोधले पाहिजे. नागरिकांना श्वासनाचे आजार होऊ शकतात. एखादा वास हानीकारक नसला तरी त्यातून डोके दुखी, मळमळ, उलट्या होणे, चिडचिड होणे, मानसिक ताण वाढणे यावर परिणाम होत असतो. हा वास विषारी आहे की कसा हे तपासले पाहिजे. वायूशी संबंधित, दुर्गंधीशी संबंधित का आणखी कशामुळे हा वास येत आहे हे त्यावरही बरेच अवलंबून आहे. मात्र वास कशाचाही असला तरी जास्त दिवस वास राहिला तर आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनीही काळजी घ्यावी’, असे आवाहन डॉ. कांबळे यांनी केले आहे.
