करमाळा (अशोक मुरूमकर) : सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपच्या गटनेतेपदी पांडे जिल्हा परिषद गटातून विजयी झालेल्या रश्मी बागल यांची निवड झाली आहे. याशिवाय उपनेतेपदी मंगळवेढा तालुक्यातील प्रदीप खांडेकर, प्रतोद म्हणून सांगोलाचे चेतनसिंह केदार व प्रवक्ता म्हणून दक्षिण सोलापूरचे नेताजी खंडागळे यांची निवड करण्यात आली आहे. बागल यांच्याकडे सोपवलेली गटनेतेपदाची जबाबदारी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
जिल्हा परिषदेच्या कारभारात भाजपची ताकद वाढवण्यासाठी व पक्षीय धोरणे प्रभावीपणे मांडण्यासाठी भाजपने नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये करमाळ्याच्या बागल यांना गटनेते म्हणून संधी मिळाली आहे. भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्षा म्हणून त्या काम पाहत आहेत. पक्षाने त्यांच्या अनुभवावर विश्वास दाखवला असून या निवडीमुळे करमाळ्यात त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
करमाळा, मंगळवेढा, सांगोला आणि दक्षिण सोलापूर सारख्या महत्त्वाच्या तालुक्यांतील नेत्यांना भाजपने जबाबदारी दिल्याने आगामी काळात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
