डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमीत्त करमाळ्यात गुरुवारपासून विविध कार्यक्रम

करमाळा (अशोक मुरूमकर) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमीत्त करमाळ्यात गुरुवारपासून (ता. ९) विविध कार्यक्रम होणार आहेत. १४ एप्रिलला डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून या मिरवणुकीचे उदघाटन तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पोलिस निरीक्षक रणजित माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

गुरुवारी (ता. ९) युनिटी ऑफ मूलनिवासी समाजचे अध्यक्ष व्याख्याते कुमार काळे यांचे ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेली संविधानिक व्यवस्था आणि वर्तमानातील संविधानासमोरील आव्हाने’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन करमाळा नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरपालिकेचे नगर अभियंता आकाश वाघमारे, डॉ. सादिक बागवान व सुमित सरडे उपस्थित राहणार आहेत.

शुक्रवारी (ता. १०) डॉ. अनिरुद्ध वनकर यांचा ‘भीमगीतांचा भव्य जलसा’ होणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन ऍड. बाबुराव हिरडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार शीतलकुमार मोटे, आण्णा काळे, सिद्धार्थ वाघमारे व प्रशांत भोसले उपस्थित राहणार आहेत.

शनिवारी (ता. ११) प्रा. संपत गारगोटे यांचे ‘शिवराय ते भीमराय’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाचे उदघाटन यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार नासीर कबीर, अशोक मुरूमकर, हर्षवर्धन गाडे व जयंत दळवी उपस्थित राहणार आहेत.

रविवारी (ता. १२) प्रबोधनकार रामपाल धारकर यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे. याचे उदघाटन संत साहित्याचे अभ्यासक प्रा. संजय चौधरी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार विशाल घोलप, सुहास घोलप, विशाल परदेशी व अशपाक सय्यद उपस्थित राहणार आहेत. सोमवारी (ता. १३) राज्यस्तरीय डान्स स्पर्धा होणार आहेत. याचे उदघाटन सानिका भगत व डॉ. कविता कांबळे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार अशोक नरसाळे, राजू सय्यद, प्रफुल्ल दामोदरे, अलीम शेख व सुनील भोसले उपस्थित राहणार आहेत. सर्व कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे होणार आहेत.

मंगळवारी (ता. १४) जयंती दिवशी सकाळी १० वाजता सामूहिक बुद्धवंदना होणार आहे. सर्व कार्यक्रम विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने होणार आहेत. मंगळवारी निघणाऱ्या मिरवणुकीत ‘भव्य सविंधान रथ’ असणार आहे. याशिवाय बँड पथक, लेझीम संघ यांचेही सादरीकरण असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *