करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखाना व कमलाई साखर कारखान्याने अद्याप शेतकऱ्यांचे ऊस गाळपाचे पैसे दिले नसल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर आज (शुक्रवारी) मोर्चा काढला. तहसील कार्यालय येथे मोर्चा आल्यानंतर या मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. पडत्या पावसात शेतकऱ्यांनी कारखानदारांविरुद्ध भावना व्यक्त केल्या.
करमाळा तहसील कार्यालय येथे मोर्चा आल्यानंतर राष्ट्रवादीचे राजकुमार देशमुख, राष्ट्रीय समाज पक्षाचे अंगद देवकाते, बहुजन संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम, प्रहारचे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर सुहास ओहोळ यांनी मनोगत व्यक्त केले. दरम्यान पाऊस सुरु झाल्याने मोर्चेकरी नायब तहसीलदार शैलेश निकम यांच्या दालनात गेले. दरम्यान ठोस निर्णय मिळेपर्यंत शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात ठिय्या मांडला. आंदोलनादरम्यान पाऊस सुरु असतानाही शेकडो शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. आळजापूर येथील बहुतांश शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.
मकाई व कमलाई साखर कारखान्याचे प्रतिनिधी आंदोलनस्थळी आले होते. दरम्यान मकाईचे प्रतिनिधी शेतकऱ्यांशी संवाद साधत असतानाच त्यांना रोखण्यात आले. ‘तुमच्यावर आमचा विश्वास नसून यापूर्वी लेखी देऊन देखील आश्वासन पाळले नसल्याने’ शेतकऱ्यांनी त्यांना धारेवर धरले. पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. कारखान्यावरकारवाई केलेली असतानाही दिरंगाई केली जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. ज्या अधिकाऱ्यांना कारवाई करण्याची जबाबदारी आहे. त्यांनी लोकभावना लक्षात घेऊन कारवाई करून शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत, अशी अशा व्यक्त केली. त्यावर नायब तहसीलदार निकम यांनी कायदेशीर कारवाई सुरु असून कारखान्यांना नियमाप्रमाणे नोटीस दिल्या आहेत, असे सांगितले. यावेळी प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव यांच्या कारभाराबाबतही संताप व्यक्त करण्यात आला. मात्र जाधव हे निवडणूक कामानिमित्त सोलापुरात बैठकीला गेले असल्याचे सांगण्यात आले. शेतकऱ्यांचे पैसे मिळावेत यासाठी कायदेशीररित्या पाठपुरावा असल्याचे निकम यांनी सांगितले.