करमाळा (सोलापूर) : सततचे होणारे अपघात टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून सध्या नियमांची कडक अमलबजावणी केली जात आहे. अनेक अपघात हे मद्यप्राशन करून वाहन चालविल्याने होत असल्याचे निदर्शनास येत असून अशा चालकांवर कारवाई केली जात आहे. यातूनच करमाळा बायपास येथे वाहतूक पोलिसांकडून खासगी बस चालकांची मशीनद्वारे तपासणी केली जात आहे.
टेंभुर्णी- नगर मार्गावरून मोठ्याप्रमाणात जड वाहतूक होते. कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश आदी राज्यात जाणारी वाहने या मार्गाने जातात. याशिवाय काही प्रवासी घेऊन जाणाऱ्या काही खासगी बसही येथून जातात. त्यात मद्यप्राशन करून चालकाने गाडी चालवू नये म्हणून पोलिस प्रशासनाकडून चालकांची तपासणी केली जात आहे. मद्यप्राशन करून चालक आढळल्यास त्याच्यावर कारवाई केली जात आहे. पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, करमाळा उपविभागाचे पोलिस उपाधिकारी अनिल पाटील व पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या मद्यपी चालकांची तपासणी केली जात आहे. मौलालीमाळ येथे वाहतूक पोलिस प्रदीप जगताप व दीपक कांबळे हे तपासणी करत आहेत.