करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील ११ ग्रामपंचायत सदस्य असलेल्या सावडीच्या उपसरपंचावर १० सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला होता. मात्र तहसीलदारांनी बोलावलेल्या विशेष सभेवेळी एकही सदस्य हजर राहिला नाही. त्यामुळी ही सभा निष्फळ ठरवण्यात आली आहे. या राजकीय डावपेचाचा फायदा उपसरपंच महेंद्र एकाड यांना झाला आहे. कायदेतज्ञाच्या मते अविश्वसाबाबत बोलावण्यात आलेली सभा एकदा निष्फळ ठरवण्यात आल्यानंतर पुन्हा दोन वर्ष असा ठराव आणता येत नाही. त्यामुळे एकाड यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अविश्वास ठराव दाखल झाल्यानंतर तहसीलदार सात दिवसाच्या आत विशेष सभा बोलावतात. गणपूर्तीचे कारण देत ही सभा तहकूब करता येत नाही. ठरलेल्या वेळेत ही सभा होणे आवश्यक असते. सावडीत मात्र ठरलेल्या वेळेत ही सभा झालेली नाही. सभेपूर्वीच एक ग्रामपंचायत सदस्य बेपत्ता असल्याची नोंद करमाळा पोलिसात झाली होती. सभा झाल्यानंतर संबंधित सदस्य करमाळा पोलिस ठाण्यात हजर झाले आणि आमच्या इच्छेने आम्ही गेलो होतो असे सांगितले. त्यामुळे पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ऍड. सोनावणे यांच्या मते, ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर तहसीलदारांनी विशेष सभा बोलावली होती. ठरलेल्या वेळेत ही सभा होणे आवश्यक होते. त्या सभेला एकही सदस्य हजर राहिला नाही. त्यानंतर ही इतिवृत्त तयार झाले. त्यात ही सभा निष्फळ ठरली असल्याचा उल्लेख आहे. आता दोन वर्ष पुन्हा अविश्वास प्रस्ताव आणता येणार नाही, अशी कायद्यात तरतूद आहे.