करमाळा (सोलापूर) : जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनात झालेल्या हल्ल्याचा निषेध आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी बुधवारी (ता. ६) सकल मराठा समाजाच्या वतीने मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चात हजारो नागरिक सहभागी होणार आहेत. या मोर्चाला अनेक संघटना आणि समाजाने पाठींबा दिलेला आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचाही तगडा बंदोबस्त असणार आहे. या मोर्चात सर्व नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठा समाजासाठी आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे उपोषण सुरु आहे. हे आंदोलन सुरु असताना लाठीचार्ज झाला होता. त्याचा सर्वत्र निषेध केला जात आहे. यातूनच करमाळा येथे शनिवारी निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर रविवारी रस्ता रोको झाला होता. आता बुधवारी मोर्चा असणार आहे. पोथरे नाका येथून हा मोर्चा निघणार आहे. मेन रोडने छत्रपती चौक येथे हा मोर्चा येऊन श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून दत्त पेठेतून सुभाष चौक येथे हा मोर्चा येणार आहे. तेथून राशीन पेठ येतून हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले जाणार आहे. तेथून गायकवाड चौकातून पूना रोडने हा मोर्चा तहसील कार्यालय येथे जाणार आहे. तेथे पंचायत समिती समोरील मैदानात मोर्चेकरांच्या वतीने पाच मुली मनोगत व्यक्त करणार आहेत.
तहसील कार्यालय येथे मोर्चेकरांच्या वतीने प्रशासनाला निवेदन दिले जाणार आहे. या मोर्चात सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था बाजार समिती व तहसील कार्यालय परिसरात असणार आहे. हा मोर्चा शांततेत व्हावा यासाठी साधारण २० समनव्यक नियोजन करत आहेत. मोर्चेकरांसाठी पोथरे नाका व तहसील कार्यालय परिसरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असणार आहे, असे सांगण्यात येत आहे. तहसील कार्यालय परिसरात मनोगत व्यक्त करणाऱ्या मुलींसाठी छोटा मंच उभारण्यात आला आहे. या मोर्चात करमाळा शहरासह तालुक्यातून अनेक नागरिक सहभागी होणार आहेत. साधारण १० हजार नागरिक या मोर्चात सहभागी होतील, असा अंदाज आहे.