करमाळा (अशोक मुरूमकर) : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या आज (शनिवारी) करमाळा दौऱ्यावर आल्या होत्या. ‘शिव- शक्ती परिक्रमा’चा आज त्यांचा सहावा दिवस आहे. परांडा येथून त्या करमाळ्यात आल्या. मात्र नियोजित दौऱ्यात बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट असा उल्लेख असताना त्यांचा तापा मात्र बायपासने जामखेडकडे गेला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या कार्यालयालाही त्या भेट देणार होत्या. मात्र तेथेही त्या गेल्या नाहीत. यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरु आहे.
पंकजा मुंडे या करमाळा दौऱ्यावर आल्या असताना श्री कमलादेवीचे त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर तेथेच कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. माजी आमदार नारायण पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, जगताप गटाचे युवा नेते शंभूराजे जगताप आदी उपस्थित होते. श्रीदेवीचामाळ येथे मुंडे यांचे भव्य स्वागत झाले. त्यानंतर तेथील कार्यक्रम झाल्यानंतर करमाळा बायपास चौकात भाजपचे चंद्रकांत राखुंडे, अमरजित साळुंखे, दीपक चव्हाण यांनी मुंडे यांचे स्वागत केले.
मुंडे यांच्या नियोजित दौऱ्यात बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांच्या निवास्थानी नाश्ता व सदिच्छा भेट असा उल्लेख होता. त्यामुळे श्रीदेवीचामाळ येथून बागल यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मुंडे यांच्या ताफ्यावर पुष्पवृष्टी करण्याची तयारी भाजप कार्यकर्त्यांनी केली होती. मात्र ऐनवेळी मुंडे यांचा ताफा बायपास चौकातून नगरच्या दिशेने वळून जामखेड रोडने गेला. मुंडे या बागल कार्यालयातून चिवटे यांच्या कार्यालयाकडे येणार असल्याची माहिती माध्यम प्रतिनिधींना देण्यात आली होती. मात्र त्या तेथीही गेल्या नाहीत. मुंडे या बागल यांच्या निवासस्थानी येणार होत्या त्यामुळे तेथेही कार्यकर्ते थांबले होते. मात्र मुंडे येणार नसल्याचे समजताच कार्यकर्ते तेथून गेले.
मुंडे यांच्या ताफ्याच्या पुढे जगताप यांची गाडी होती. त्यामुळे अनेकांना वाटले मुंडे माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या सटवाई येथील निवासस्थानी गेल्या. त्यामुळे अनेक कार्यकर्ते तेथेही गेले मात्र, बाहेर ताफा न दिसल्याने पुन्हा माघारी आले. मुंडे यांचा बागल यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट असा उल्लेख असताना दौऱ्यात बदल का केला अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. शिवसेनेचे चिवटे यांच्या कार्यालयात येणार असे सांगितलेले असतानाही त्या तेथेही का गेल्या नाहीत यांची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.