करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाली मात्र आता भविष्यातील राजकारणाची समीकरणे जोडली जाऊ लागली आहेत. मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील कट्टर विरोधक असलेले जगताप गटाच्या ताब्यात बाजार समिती देण्यासाठी पाटील व बागल गटाला दोन- दोन जागेवर समाधान मानावे लागले आहे. ही आताची तडजोड झाली पण पुढचे राजकारण कसे असेल यावर आता अंदाज बांधले जाऊ लागले आहेत. तालुक्यात शिंदे गटाला रोखण्यासाठी याचा फायदा होणार अशी चर्चा सुरु असतानाच शिंदे गटालाही याचा फायदा होणार असा अंदाज वर्तवला जात आहे.
करमाळा बाजार समितीत शिंदे गटाने सुरुवातीलाच जगताप गटाला बिनशर्त पाठींबा दिला होता. सुनील सावंत यांचा राहिलेला एकमेव अर्जही काढण्यासाठी स्वतः आमदार संजयामामा शिंदे यांनीही त्यांना अर्ज मागे घ्या, असे सांगितले होते. या निवडणुकीत आपण स्थानिक संस्थात हस्तक्षेप करत नसल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला. जगताप, पाटील व बागल यांचा समझोता फक्त बाजार समितीपुरताच आहे भविष्यात यांचे चित्र कसे राहणार हे अद्याप पुढे आलेले नाही. निवडणूक बिनविरोध होताना शिंदे समर्थकही तहसील परिसरात ठाण मांडून होते. त्यामुळे आम्ही जगताप गटाबरोबर असल्याचे त्यांनी दाखवून दिले. निवडणुकीत शिंदे गटानेही अर्ज दाखल केले होते. मात्र जगताप व शिंदे यांच्या आदेशानेच ते अर्ज दाखल केले होते. आदेशानंतरच अर्ज मागेही घेतले असे सांगितले जात आहे.
शिंदेना असा होऊ शकतो फायदा
१) शिंदे गटातील पहिल्या फळीतील कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार बाजार समिती ही जगताप गटाच्या ताब्यात रहावी म्हणून बिनशर्त पाठींबा दिला होता. चंद्रकांत सरडे यांनी अर्ज मागे घेतेवेळी जगताप आणि शिंदे यांचा निर्णय अंतिम असल्याचे सांगितले होते. त्यामुळे जगताप व शिंदे हे एकत्रितच राहणार आहेत. त्यांच्यात दुरावा नसल्यामुळे भविष्यातही फायदाच होणार आहे.
२) बाजार समितीमध्ये जगताप, पाटील व बागल यांच्यात समझोता झाला. मुळात शिंदे गटाची निर्मितीही जगताप, पाटील व बागल यांच्यातील नाराज कार्यकर्त्यांमुळे झाली आहे. या निवडणुकीत पुन्हा हे तिघे एकत्र आल्याने यांच्यातील नाराज हे शिंदे गटाकडे जातील, असा अंदाज वर्तवला जात आहे. भविष्यात काय होईल हे पहावे लागणार आहे. मात्र यावर सध्या चर्चा सुरु आहे.
३) गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शिंदे यांनी तटस्थ भूमिका घेतली होती. (वामनराव बदे व इतर वगळून) त्यामुळे बागल यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवण्याचा आणि तोही मार्ग मोकळा असल्याचे सांगितले जात आहे. मात्र येणाऱ्या काळात कशी वाटचाल होईल, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.
४) शेटफळसारख्या गावात शिंदे गटात कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला म्हणजे शिंदे गट तालुक्यात वाढत आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात शिंदे गटाचे कार्यकर्ते तयार झाले आहेत. हे सर्व जगताप, पाटील, बागल या गटातीलच आहेत. सध्या शिंदे गट त्यांना पर्याय वाटत आहे. म्हणूनच षीने गट वाढत आहे. भविष्यात त्याचा आणखी फायदा होईल, अशी चर्चा सुरु आहे.
५) बागल, पाटील व जगताप हे करमाळ्यातील राजकारणातील पारंपरिक गट आहेत. अपवाद सोडले तर बाजार समिती ही जगताप यांच्यात ताब्यात राहिलेली आहे. यावर्षीही निवडणूक झाली असती तर काय झाले असते? बिनविरोध देण्यापेक्षा लढून जो काय निकाल येईल तो मान्य झालाच असता. त्यामुळे नागरिकांपर्यंत पोहोचण्याची संधी होती. मात्र ती संधी हुकवली. या निर्णयात सामान्य कार्यकर्त्यांचे मत विचारात घेतले नसल्याने अनेकांमध्ये नाराजी आहे, अशी चर्चा आहे. (पाटील, बागल व जगताप यांच्या गटाचे फायदेही दुसऱ्या स्टोरीत)