करमाळा (अशोक मुरूमकर) : सर्वांचे लक्ष लागलेली करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर आता तालुक्यात १६ ग्रामपंचायतीच्या सरपंचासह सदस्यांची निवडणूक जाहीर झाली आहे. यामध्ये जेऊर, वीट, केम, केत्तूर, कंदर, कोर्टी, रामवाडी, उंदरगाव, घोटी, निंभोरे, गौडरे, राजुरी, कावळवाडी, भगतवाडी, चिखलठाण व रावगावचा समावेश आहे. यामध्ये काही पोटनिवडणुकाही आहेत. तालुक्यातील पाटील, बागल, शिंदे व जगताप या पारंपारिक गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये ही निवडणूक असेल. बाजार समितीचा या निवडणुकीवर काय प्रभाव पडणार का? हे पहावे लागणार आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमुळे ही निवडणूक चारही गटासाठी प्रतिष्टेची असणार आहे.
निंभोरे, घोटी, रामवाडी व उंदरगावमध्ये सरपंचाचे आरक्षण हे सर्वसाधारण आहे. त्यामुळे येथे मोठी रंगत येईल अशी शक्यता आहे. गौडरे, राजुरी, कावळवाडी, भगतवाडी, चिखलठाण व रावगाव येथे सरपंचपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला आहे. त्यामुळे येथेही चुरशीची निवडणूक होऊ शकते. केम व कोर्टी येथे नागरिकाचा मागास प्रवर्ग (महिला) असे आरक्षण आहे. जेऊर व कंदर येथे नागरिकाचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) आरक्षण आहे. वीट व केत्तूर येथे अनुसूचित जाती सर्वसाधारण असे आरक्षण असणार आहे. सोमवारपासून (ता. 16) निवडणुकीसाठी अर्ज दाखल करता येणार आहे. 20 तारखेपर्यंत याची मुदत राहणार आहे. तर 5 नोव्हेंबरला मतदान असणार आहे.
रामवाडी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी केला जाऊ शकतो. गेल्या एका बैठकीत सर्व गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये याबाबत चर्चाही झाली होती. गावातील नागरिकांचा एक विचार ठेवण्यासाठी प्रयत्न केला जाऊ शकतो. निंभोरे येथे स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले अनेक तरुण आहेत. त्यांचा निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याला किती यश येणार हे पहावे लागणार आहे. येथे पाटील, बागल, शिंदे व जगताप गटाचे कार्यकर्ते आहेत. निवडणूक झाली तर चुरशीची निवडणूक होऊ शकते, असा अंदाज आहे. उंदरगाव येथे निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. मात्र सर्व कार्यकर्त्यांची बैठक झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे.