सोलापूर : जिल्हयात दिनांक 15 ते 24 ऑक्टोबर 2023 या कालावधीत नवरात्र उत्सव साजरा होत आहे. तसेच दि. 28 ऑक्टोबर 2023 रोजी कोजागिरी पौर्णिमा येत आहे. या पार्श्वभूमीवर शक्तीदेवी मुर्तीची प्रतिष्ठापना मिरवणूकीने होत असते, या कालावधीत शक्तीदेवीची पुजाअर्चा, विविध प्रकारचे कार्यक्रम व विसर्जन मिरवणूका काढण्यात येतात. दि. 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर हद्द वगळून ) विना परवाना, मिरवणूका, मोर्चे, निदर्शने, पदयात्रा, वाद्य, गायन, वाद्य संगीत, गोंगाट करण्यास महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36, 38 अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारान्वये मनाई करण्यात आल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी जाहीर केला आहे.
जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे स्वाधीन असलेले पोलीस ठाणे अंमलदार व त्यांच्या वरिष्ठ अधिका-यांना म.पो.का. 1951 चे कलम 36 (क ते च), 38 पोट कलम 2 अन्वये मोर्चे, मिरवणूका,निदर्शने, पदयात्रा, गोंगाटास, आवाजास मनाई करण्यासाठी त्यांचे नियंत्रण व विनियमन करण्यासाठी त्यास योग्य वाटतील अशा सुचना कोणत्याही व्यक्तीस देण्यासाठी आधिकार देत आहे. कोणत्याही इसमाने सदरचा आदेश लागू असे पर्यंत जिल्हयात (पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहर हद्द वगळून) वाद्य, गायन, वाद्य संगीत साधन, पात्र ज्यातून प्रतिध्वनी निर्माण होईल असे यंत्र ज्यातून आवाज निर्माण होतो असा व्यवसाय किंवा कार्यक्रम संबंधीत ठाणेदार किंवा त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिका-यांकडून परवानगी घेतल्याशिवाय वाजविता येणार नाही. असेही आदेशात म्हटले आहे.
मिरवणूका, मोर्चे, निदर्शने, पदयात्रा इत्यादी कार्यक्रम संबंधित ठाणेदार किंवा त्यापेक्षा वरिष्ठांकडुन तारीख व वेळासंबंधी सभेची जागा, मिरवणूका मार्ग, मोर्चे मार्ग त्यात दिल्या जाणा-या घोषणांचा अंतर्भाव निश्चित केल्याशिवाय आयोजित करु नये. जाहिर सभा, मिरवणूका, मोर्चे, पदयात्रेत समायोचित घोषणा सोडून किंवा ज्या घोषणांनी शांततेस व सुव्यवस्थेस बाधा होवू शकते, अशा घोषणा देवू नये.
सदर आदेश लग्नाच्या प्रसंगास व प्रेत यात्रेस लागू नाही. आदेशाचा भंग केल्यास तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 136 अन्वये शिक्षेस पात्र राहिल. असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.