सोलापूर : जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सोलापूर येथे सोमवारी (ता. 12) सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत शैक्षणिक प्रकरणांच्या त्रृटींची पूर्तता करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी ज्या अर्जदारांचे प्रकरण सद्यस्थितीत त्रृटीमध्ये आहे, अशा सर्व अर्जदारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सचिन कवले यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
पत्रकात म्हटले आहे, अर्जदार यांच्या प्रस्तावाला कोणती त्रृटी आहे, याबाबत ई-मेल व भ्रमणध्वनी संदेश द्वारे कळविण्यात आले आहे. तरी अर्जदार यांनी आपला ई मेल तपासून त्रृटींची पूर्तता शिबिरामध्ये करावी जेणेकरुन जात वैधता प्रमाणपत्राअभावी शैक्षणिक अभ्यासक्रम प्रवेशापासून कोणीही अर्जदार वंचित राहणार नाही. प्रस्तावासोबत जोडलेली सर्व मूळ कागदपत्रे, मानिव दिनांकापूर्वीचे जात नोंद पुरावे जोडावेत. सर्व अर्जदार, पालक यांनी याची नोंद घ्यावी. अर्जदार यांनी त्रृटींची पूर्तता वेळेत सादर न केल्यास आपला अर्ज निकाली काढण्यात येईल.
2023- 24 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी आरक्षित जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. त्यामुळे 2023- 24 या वर्षासाठीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यास इच्छुक ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज दाखल केलेले नाहीत, त्यांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करुन ऑनलाईन अर्जाची प्रत व त्यासोबत सर्व कागदपत्रे जोडून त्याची प्रत तात्काळ सादर करावी, असे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे.