करमाळा (सोलापूर) : कंत्राटी भरती संदर्भात सर्व GR महाविकास आघाडी सरकारने काढले होते. हे सर्व GR शिंदे- फडणवीस व अजित पवार सरकारने रद्द केले आहेत. मात्र कंत्राटी भरती GR च्या संदर्भात मविआ नेत्यांनी महायुती सरकारवर बदनामी करण्याचे कटकारस्थान रचले असल्याचा आरोप करत भाजपने ‘माफी मांगो आंदोलन’ पुकारले आहे. त्यातूनच करमाळ्यात संगम चौक येथे भाजपच्या वतीने शनिवारी (ता. 21) सकाळी १० वाजता ‘मविआ’चा पुतळा जाळून निषेध करत ‘माफी मागो आंदोलन’ करण्यात येणार आहे. यासाठी करमाळा तालुका भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या आंदोलनाला सोलापूर जिल्हा ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंग केदार- सावंत उपस्थित राहणार आहेत. याबाबत करमाळा पोलिस ठाण्यास निवेदन देण्यात आले आहे. यावेळी भाजपचे करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंभूराजे जगताप, शशिकांत पवार, सुहास घोलप आदी उपस्थित होते. सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक महुरकर यांनी निवेदन स्वीकारले.