करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी १११ तर सदस्यपदासाठी 638 अर्ज दाखल झाले आहेत. सर्वात मोठ्या केम येथे सरपंचपदासाठी दोनच अर्ज दाखल झाल्याने दुरंगी निवडणूक होणार आहे. तर माजी आमदार नारायण पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील हे जेऊर ग्रामपंचायतीच्या रिंगणात उतरले आहेत. तेथे सात इच्छुकांनी अर्ज दाखल केले आहेत. पाटील यांना रोखण्यासाठी येथे सर्व विरोधी गट एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. वीट येथे शिंदे गटाचे दोन व पाटील गटाचा पॅनल निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. बागल गट येथे काय करणार हे पहावे लागणार आहे. कावळवाडीत शिंदे गटाचे अनिल शेजाळ यांनी शक्तिप्रदर्शन करत पॅनल दिला आहे. बागल गटाचे रामभाऊ हाके यांच्याविरुद्ध येथे लढत होणार आहे. रामवाडीत गौरव झांजुर्णे हे रिंगणात उतरले आहेत. तर चिखलठाण येथे शिंदे गटाचे समर्थक चंद्रकांत सरडे यांच्याविरुद्ध पाटील व बागल गटाचे कार्यकर्ते एकत्र आले आहेत. शिंदे गटाचे समर्थक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड हेही सरडे यांच्याविरुद्ध आहेत. कंदर, रावगाव, कोर्टी, केत्तूर येथीलही निवडणूक लक्षवेधी होणार आहे.
करमाळा तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीची ही निवडणूक विधानसभा निवडणुकीवर प्रभाव पडणारी ठरण्याची शक्यता आहे. या टप्यात मोठ्या ग्रामपंचायती असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पंचायत समितीच्या सभागृहात अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया झाली. घोटी, रामवाडी, कावळवाडी येथील इच्छुकांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले.
आज आखेर एकूण सदस्यपदासाठी दाखल झालेले अर्ज : कावळवाडी 18, रामवाडी 18, भगतवाडी 21, राजुरी 33, उंदरगाव 14, चिखलठाण 39, गौंडरे 36, कंदर 62, कोर्टी 47, निंभोरे 39, केत्तुर 44, वीट 63, घोटी 57, रावगाव 52, केम 45, जेऊर 50 असे 638 अर्ज आहेत.
सरपंच पदासाठी दाखल झालेले अर्ज : कावळवाडी 4, रामवाडी 8, भगतवाडी 5, राजुरी 8, उंदरगाव 9, चिखलठाण 4, गौंडरे 8, कंदर 7, कोर्टी 10, निंभोरे 9, केत्तुर 12, वीट 8, घोटी 5, रावगाव 5, केम 2 व जेऊर 7 असे एकूण 111अर्ज दाखल झाले आहेत.
स्थनिक पातळीवर पाटील, शिंदे, बागल व जगताप गटाच्या कार्यकर्त्यांनी सोईनुसार निर्णय घेत अर्ज दाखल केले आहेत. केम येथे प्रहारचे संदीप तळेकर यांचा अर्ज दाखल झाला आहे. सोमवारी (ता. २३) अर्जाची छाननी होणार असून अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीत जेऊरमध्ये पाटील गटाला शह देण्यासाठी सर्व गट एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. केममध्ये मोहिते पाटील समर्थक अजित तळेकर यांच्या पॅनलला तर चिखलठाणमध्ये शिंदे गटाचे समर्थक चंद्रकांत सरडे यांना रोखण्यासाठी विरोधक एकत्र आले आहेत. त्यामुळे येथील निवडणुका लक्षवेधी ठरणार आहेत. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे हे या निवडणुकीत योग्यवेळी भूमिका मांडणार आहेत.