करमाळा (सोलापूर) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी करमाळा तहसील कार्यालयासमोर सकल मराठा समाज व बहुजन समाजाच्या वतीने आजपासून (गुरुवार) साखळी उपोषण सुरु झाले आहे. मनोज जरांगे ज्याप्रमाणे आदेश देतील त्याप्रमाणे आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार असल्याचे सांगत या आंदोलनाला पहिल्याच दिवशी अनेक संघटनांनी पाठींबा दिला आहे. हे आंदोलन शांततामय मार्गाने अधिक तीव्र व्हावे यासाठी तालुक्यातील प्रत्येक गाव एकदिवस येथे आंदोलन करणार आहे. या आंदोलनाला पाठींबा देत 16 गावांमध्ये नेत्यांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
करमाळा तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु केल्यानंतर प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव व पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी आंदोलनस्थळी भेट दिली. या आंदोलनाला करमाळा तालुक्यातील अनेक गावातील व विविध समाजाच्या बांधवांनी पाठींबा दिला आहे. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तालुक्यात पोथरे, जातेगाव, बोरगाव, देवळाली, वडगाव, तरटगाव, पाडळी, घारगाव, पोटेगाव, बोरगाव, दिलमेश्वर, खडकी, बाळेवाडी, फिसरे व भोसे या गावांनी ठराव करून नेत्यांना गावबंदी केली आहे.
करमाळा तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील प्रत्येक गावातील मराठा समाजातील सर्व गावातील बांधवांनी करमाळा तहसील येथे मराठा आरक्षणासाठी बेमुदत साखळी आंदोलन सुरु आहे. आपल्या मराठा समाजाचा हक्क मिळवण्यासाठी प्रत्येकी आपल्या गावाने एकी दाखवत एक दिवस मराठा आरक्षण आंदोलनासाठी द्यावा, असे आवाहन यावेळी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा तालुका व शहरने केले आहे. ‘आरक्षण नाही मतदान नाही’ असे म्हणत हे साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकारने ४० दिवसांची मुदत घेऊनही प्रत्यक्षात आरक्षणाचा निर्णय न घेतल्यामुळे मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा पेटले आहे. सोलापूर जिल्ह्यात २०० गावांमध्ये सर्व मंत्री व आमदार- खासदारांसह राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. येत्या २४ तासांत १०० टक्के गावांमध्ये ही बंदी लागू केली जाणार असल्याचे सकल मराठा समाजाने जाहीर केले आहे.
मराठा आरक्षण प्रश्नावर सरकारने मुदत घेऊनही काहीच निर्णय न घेतल्याने मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यात अंतरावली-सराटी गावात पुन्हा आमरण उपोषण सुरू केल्यानंतर त्यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाने साखळ उपोषण सुरू केले. जिल्ह्यात तालुक्यांमध्ये तहसील कार्यालयासमोरही साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे. या साखळी उपोषणात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले असून यावेळी सरकारच्या विरोधात तीव्र निदर्शनेही करण्यात आली.