करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (ता. १६) मतदान होणार आहे. एकीकडे निवडणूक प्रक्रिया सुरु असताना दुसरीकडे बागल विरोधी गटाचे मकाई बचाव समितीचे प्रा. रामदास झोळ यांच्यासह मोहिते पाटील समर्थक जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सविताराजे राजेभोसले यांचे अर्ज अपात्र ठरल्याने त्याची फेरसुनावणी झाली. मात्र न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया थांबलेली नाही. त्यामुळे सोमवारी निकाल आल्यानंतर पुन्हा वेगळे चित्र असेल असा अंदाज आहे.
मकाई सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होईल, असा अंदाज होता. मात्र शेतकऱ्यांच्या प्रतिसादानंतर आपण निवडणुकीत उतरलो आहोत, असे बागल विरोधी गटाचे प्रा. झोळ यांनी जाहीर केले. पॅनल तयार करण्यासाठी त्यांनी ताकदही लावली मात्र कारखान्याच्या नियमात त्यांचे अर्ज अपात्र ठरले. त्यामुळे पुन्हा न्यायालयीन लढाई सुरु झाली. त्यात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने करमाळा तहसील कार्यालय येथे निवडणूक निर्णय अधिकारी सोपान टोंपे यांच्या समोर शुक्रवारी (ता. ९) फेर सुनावणी झाली. याचा निकाल अजून येणे बाकी आहे. हा निकाल सोमवारी अपेक्षित आहे. त्यानंतर तालुक्यात पुन्हा वेगळे चित्र असेल.
प्रा. झोळ यांच्यासह अपील केलेले अर्ज मंजूर झाले किंवा राखीव जागांवरील अर्ज मंजूर झाले तर पुन्हा राजकीय परिस्थितीत बदलले. माया झोळ, सविताराजे राजेभोसले, अशोक जाधव आदींचे अर्ज राखीव जागांवर आहेत. निकाल काय असेल हे कोणालाच सांगता येत नाही. मात्र जर अर्ज मंजूर झाले तर बागलविरोधी गटाला प्रचार करणे व त्यांचे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवणे, त्यांच्या भेटी घेणे हे आव्हान असेल. कारण सोमवारी १२ तारखेला निकाल झाला तरी प्रचारासाठी किंवा पुढील प्रक्रियेसाठी फक्त दोन दिवस सापडणार आहेत. १६ तारखेला मतदान असून १५ तारखेला मतपेट्या मतदान केंद्रावर जातील.
प्रा. झोळ यांच्या म्हणण्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमोर झालेल्या झालेल्या फेर सुनावणीत आमचे अर्ज पात्र होती. हा निकाल आल्यानंतर पुढील रणनीती आखली जाईल. मात्र या निवडणुकीत आम्हाला प्रचार करण्यासाठी कालावधी कमी पडणार आहे. त्यामुळे ही मतदान प्रक्रियेला मुदतवाढ देणे आवश्यक आहे. तशी आम्ही मागणी करत आहोत.