करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे २०२२- २३ या गाळप हंगामातील २५०० रुपये प्रति टनाप्रमाणचे थकीत ऊस बिल १२ महिने झाले तरीही दिले नाही. त्यामुळे चौकशी करून दोषी संचालक मंडळावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत शेतकरी हरिदास मोरे, मोहन पडवळे, ज्ञानेश्वर कावळे, सिद्धेश्वर कावळे, काकासाहेब गपाट व अविनाश गपाट यांनी लेखी निवेदन दिले आहे. यापूर्वी कारखान्याचे अध्यक्ष व तहसीलदार यांच्या लेखी आश्वासनानंतर अनेकदा आंदोलन स्थगित झाले मात्र अजूनही पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे गुन्हा दाखल करून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
२०२२- २३ या गळीत हंगामासाठी मकाई कारखान्याने मोरे, पडवळे, कावळे, कावळे, गपाट आदी शेतकऱ्यांचा गाळपासाठी ऊस आणला. ऊस गाळपानंतर १४ दिवसात २५०० रुपये प्रमाणे प्रति टन रक्कम देणे बंधनकारक असतानाही सुमारे १२ महिने उलटून गेले तरी वेळोवेळी पत्रव्यवहार करून पाठपुरावा करून हेलपाटे मारूनही अद्यापपर्यंत कारखाना प्रशासनाने दिलेले नाहीत. सध्या मुलांचे शिक्षण, कपडे तसेच शेतीसाठी खते, औषध, बीबियाणे, मशागतीसाठी व दवाखान्यासाठी पैसे नसल्याने कर्ज वाढत चालले आहे. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकारमंत्री, विरोधी पक्ष नेते, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, साखर आयुक्त, तहसीलदार आदींना पत्रव्यवहार करण्यात आला आहे.