करमाळा (सोलापूर) : करमाळा अर्बन बँकेचा प्रशासक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सहाय्यक निबंधक दिलीप तिजोरे यांनी थकीत कर्जदारांना ‘एक रकमी कर्ज परतफेड योजना’ आणली. याला प्रतिसाद मिळाला असून योजनेअंतर्गत 1 कोटी 70 लाखाची वसुली झाली आहे. 70 थकीत कर्जदारांनी आपली कर्ज खाती बंद केली आहेत. ३० जूनपर्यंत ही योजना राहणार असून त्यानंतर थकीत कर्जदारांच्या तारण मालमत्तेचा जाहीर लिलाव केला जाणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे.
तेजोरे म्हणाले, सभासद थकीत कर्जदारांना जामीनदार आहेत. तेही थकीत कर्जास कर्जदारा एवढेच जबाबदार आहेत. थकीत कर्जाच्या वसुलीपोटी आपल्यावरही जामीनदार म्हणून कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यांनीही कर्जदारांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याकडील थकीत कर्जाची रक्कम बँकेत भरण्याच्या सूचना कराव्यात. सूचना करूनही कर्जदार ऐकत नसेल तर कर्ज भरण्याचा तगादा लावावा, अन्यथा जामीनदाराच्या मालमत्ता जप्त करून कर्जाची परतफेड केली जाईल.
बँकेच्या सर्व थकीत कर्जदारांनी व त्यांच्या जामीनदारांनी सध्या सुरु असलेली 6 टक्के व्याज दराच्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.