करमाळा (सोलापूर) : शिक्षणासाठी ग्रामीण भागातून करमाळा शहरात येणारी काही मुलं जीन मैदान परिसरात हुजत घालत असल्याचा प्रकार पोलिसांच्या लक्षात आला. या वादाची माहिती मिळताच पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि या वादातील मुलांकडून चौकशी केली आणि त्यांच्या पालकांना बोलावून ‘खाकी’चा धाक दाखवून त्यांना योग्य ती समज दिली. यावेळी शहर बीटचे पोलिस कॉन्स्टेबल मंगेश पवार यांनी पालक आणि मुलांचा चांगलाच क्लास घेतला. शेवटी मात्र पालकांनीही कर्तव्यदक्ष पोलिस अधिकाऱ्यांचे आभार मानले.
करमाळा शहरात आज (सोमवार) सकाळी १२ वाजताच्या दरम्यान काही मुलांमध्ये किरकोळ कारणातून वाद सुरु झाला. याचे रूपांतर हाणामारीत होणार तेवढ्यात तात्काळ पोलिस तेथे दाखल झाले आणि दोन्ही गटातील मुले ताब्यात घेण्यात आली. ही मुले वेगवेगळ्या आणि वेगळ्या रुटवरील एसटीने कॉलेजला येत होती. गैरसमजातून हा वाद सुरु होता. पोलिसांनी योग्यवेळी यामध्ये हस्तक्षेप केला आणि या वादावर पडदा पडला.
श्री. पवार म्हणाले, ‘मुलं शिक्षणासाठी ग्रामीण भागातून कॉलेजला येतात. मात्र अनेकदा पालकांचे त्यांच्यावर लक्ष नसते. मुलांकडे मोबाईल का दिला जातो? दिला तर ते मोबाईलमध्ये काय पहातात व करतात हे पहाणे आवश्यक आहे. अनेकदा आमच्याकडे वाद आल्यानंतर मुलांचे मोबाईल तपासले तर शिक्षणाचा काहीही संबंध नसलेले तपशील आढळून येतात. याकडे पालकांनी गांभीर्याने पहाणे आवश्यक आहे.’
पुढे बोलताना पवार म्हणाले, ‘मुलांना योग्यवेळी अभ्यासाची आणि कष्टाची जाणीव करून देणे ही पालकांची जबाबदारी आहे. त्यांना कष्ट करण्याचे समजले नाही तर ते नको ते काम करत राहतात. त्यांच्या आरोग्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. जर याकडे गांभीर्याने पाहिले नाही तर त्याचा परिणाम आयुष्यावर होतो.’ ‘महाविद्यालयीन शिक्षण घेताना मुलांनी अवांतर वाचनावरही भर देणे आवश्यक आहे. महाविद्यालयात आपण ग्रंथालय शुल्क भरतो मात्र त्याचा कधी वापर केला जातो का? वाचन ही काळाची गरज आहे. वाचनाने मन शांत होते आणि ज्ञानात भर पडते. आजचा विद्यार्थी हा उद्याचा चांगला नागरिक, अधिकारी व व्यवसायीक आहे. त्यामुळे त्याला घडवणे ही जबाबदारी पालकांचीही आहे. शाळा व महाविद्यालयात पाठवले म्हणजे आपले कर्तव्य संपत नाही तर त्यावर लक्ष ठेवणेही देखील जबाबदारी आहे.’, असे आवाहन त्यांनी केले आहे. करमाळा शहारत बीट अंतर्गत कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
यावेळी वाहतूक अंमलदार प्रदीप जगताप व दीपक कांबळे, निर्भया पथकातील अंमलदार पोलिस हवालदार शहाजी डुकरे, पोलिस कॉन्स्टेबल संभाजी पवार, गणेश गुटाळ, दादा गायकवाड, करमाळा शहर बीटमधील पोलिस हवालदार भाऊराव शेळके उपस्थित होते.