करमाळा (सोलापूर) : येथील गुरुकुल पब्लिक स्कूलचे दोनदिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले. नर्सरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस उपनिरीक्षक विनायक माहुरकर, डॉ. ब्रिजेश बांडगुर, ईरा पब्लिक स्कूलचे संस्थापक भारत वारे, करमाळा पोलिस हेमंत पाटोळे, सोमनाथ गावडे व चंद्रकला भोगे उपस्थित होते.
कार्यक्रमात नर्सरी ते दुसरीच्या २५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी भाग घेतला. सांस्कृतिक कार्यक्रमात 1955 ते 1999 दरम्यानची गाणी होती. शम्मी कपूर, शशि कपूर, अमिताभ बच्चन, रेखा, माधुरी आदी दिग्गज कलाकारांच्या गाण्यांचा समावेश थीममध्ये होता. ‘चित्रपटांकडे, गाण्यांकडे मनोरंजन म्हणून पाहत नाही त्यातील कलाकारांचे, त्यांच्या वागण्याचे, त्यांच्या राहणीमानाचे अनुकरण करत असल्यामुळे त्यांच्यावर जास्त विदेशी, पाश्चात्य संस्कृतीचा, विचारांचा आधुनिक फॅशनचा प्रभाव पडत चालला आहे त्यामुळे भारतीय संस्कृतीचा, परंपरांचा, सभ्यतेचा विसर पडत चालला आहे. ओल्ड इज गोल्ड म्हणजे जुनं ते सोनं हे विद्यार्थ्यांना दाखवण्यासाठी अस्सल नृत्य, अस्सल संगीत, अस्सल गायन, अस्सल अभिनय काय असतो हे बालकलाकारांना समजावे’ या उद्देशाने हा सांस्कृतिक कार्यक्रम होता. कार्यक्रमासाठी 500 हून अधिक पालकांनी उपस्थिती दर्शवली. प्रस्ताविक भगत मॅडम यांनी तर सूत्रसंचालन पवार मॅडम व शिंदे मॅडम यांनी केले.
शनिवारी झालेल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण साने, अस्थिरोग तज्ञ डॉ. महेश भोसले, स्त्री रोग तज्ञ डॉ. विशाल शेटे, तंत्रस्नेही राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त रणजीत वारे उपस्थित होते. सूत्रसंचालन गेंड मॅडम यांनी केले. या टप्प्यात दुसरी ते आठवीपर्यंतच्या 400 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमातील सर्व गाणी ही कलर्स ऑफ इंडिया या थीमवर आधारित बसविण्यात आली होती. देशातील सर्व राज्य लक्षात घेता प्रत्येक राज्याची संस्कृती, भाषा, राहणीमान ,चालीरीती, देशातील विविधतेत एकता दाखवण्याचा गुरुकुल पब्लिक स्कूलने प्रयत्न केला. या कार्यक्रमासाठी दीड हजारपेक्षा अधिक पालक वर्ग उपस्थित होते. सर्व पालक वर्गाकडून, प्रमुख पाहुण्यांकडून, उपस्थित मान्यवरांकडून या कार्यक्रमाचे कौतुक झाले. शेवटी वंदे मातरम घेऊन कार्यक्रम संपन्न झाला. संस्थेचे संस्थापक नितीन भोगे व सौ. भोगे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.