करमाळा (अशोक मुरूमकर) : भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज (सोमवारी) माजी आमदार जयवंतराव जगताप यांची भेट घेतली आहे. करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे त्यांनी ही भेट घेतली आहे. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मोहिते पाटील यांनी तालुक्यातील एकमेकांचे कट्टर विरोधक जगताप, बागल व पाटील गट एकत्र आणले होते. त्यानंतर जगताप गटाच्या ताब्यात ही बाजार समिती आली. जगताप व आमदार संजयमामा शिंदे हे सध्या एकत्र आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचेही मतदार संघात दौरे वाढले आहेत. त्यात मोहिते पाटील यांच्याकडूनही भेटीगाठी सुरु आहेत. त्यामुळे माजी आमदार जगताप यांची भेट महत्वाची मानली जात आहे. जगताप यांच्यासह त्यांनी करमाळा तालुक्यातील इतरही काही प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या असल्याची माहिती आहे.
जगताप यांनी तालुक्यात आमदार संजयमामा शिंदे यांचे वरच्या राजकारणात भाजपचे काम करण्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. जगताप यांनी लोकसभा निवडणुकीत यापूर्वी भाजपचे सुभाष देशमुख यांचे काम केले होते. गेल्या निवडणुकीत तर त्यांचे चिरंजीव शंभूराजे जगताप यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मंत्री चंद्रकांत पाटील यांचीही त्यांनी भेट घेतली होती. आताही ते भाजपच्याच उमेदवाराला मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न करतील, असे बोलले जात आहे. मात्र भाजपचे उमेदवार कोण असतील हे पहावे लागणार आहे.
जगताप व मोहिते पाटील यांच्या भेटीवेळी डॉ. अमोल घाडगे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, अमरजित साळुंखे, माजी नगराध्यक्ष दीपक ओहोळ, जिल्हा गट सचिव सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष बबनराव मेहेर, खरेदी विक्री संघाचे संचालक शहाजी शिंगटे, श्रीदेविचामाळचे माजी सरपंच दादासाहेब पुजारी, दत्तात्रय नलवडे, भास्कर नाळे, जोतीराम ढाणे आदी उपस्थित होते.